पुणेरी टांगेवाले

पुण्यात काही दशकांपूर्वी टांगेवाले अस्तित्वात होते. कारण बससेवा १९४० नंतर सुरु झाली. तेव्हा प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला टांग्याशिवाय दुसरे सोयीस्कर साधन उपलब्ध नव्हते. व्हिक्टोरिया म्हणजे बग्गी देखील त्याकाळात कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. शहरात अनेक ठिकाणी टांगेवाल्यांचा थांबा असायचा. अनेकवेळा फसवेगिरी करण्यात टांगेवाले पुढे असायचे. ते अनोळखी लोकांना ठरलेल्या ठिकाणी लांब वळसा घालून नेत व जास्त भाडे उकळीत. लहान मुलांना टांगेवाले जास्त दर सांगत असत. आज विविध पुस्तकांत टांगेवाल्यांचे किस्से वाचावयास मिळतात. आजही वयोवृद्ध लोकांना टांग्यांबद्दल आठवणी जिवंत असतील.


आजचा जो पुण्यातील 'ढोलेपाटील रस्ता' दिसतो, त्यास पूर्वी 'सर भांडारकर रस्ता' असे म्हणत. डेक्कनजवळ भांडारकर रस्ता होताच. तर हे टांगेवाले स्टेशनवर नव्या प्रवाशांनी 'भांडारकर रस्ता' सांगितले की पूर्वीच्या 'सर भांडारकर' रस्त्यावर म्हणजेच आजच्या ढोले पाटील रस्त्यावर न्यायचे. यावर उपाय म्हणून माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांनी आपल्या वडिलांचे म्हणजेच कै. बाळकृष्ण ढोले पाटील यांचे नाव त्या रस्त्यास दिले.

छायाचित्र - नेट साभार

ठराविक लोकांचे खास टांगेवाले असत. टांग्यांचा कायम वापर करणारी अनेक मोठी लोकं तेव्हा पुण्यात होती. नाहीतर इतर वेळेस कोंबून प्रवासी भरले जात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा देखील असाच भाडोत्री टांगा असे. तो सुद्धा नारायणपेठेत रहात असे. 'आढाव काका' असे त्या टांगेवाल्याचे नाव होते, असे समजते. तसेच साहित्य सम्राट न. चिं. केळकर, सरदार आबासाहेब मुजुमदार व सरदार नातू हे देखील टांगे वापरीत. पुण्याच्या काही जुन्या छायाचित्रांमधून पुणेरी टांगेवाले दिसून येतात. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांनीदेखील 'पुणेरी टांगेवाला' असा विनोदी लेख पुण्यातल्या टांगेवाल्यांवर कधीकाळी लिहिला होता.


टांग्यांचा दर आण्यांमध्ये असे. शहरात अनेक सोयीच्या ठिकाणी टांग्यांचे स्टॅन्ड असत. पेरूगेटजवळ भावे हायस्कुल समोर, एस. पी. कॉलेजसमोर, नारायण पेठेत कन्याशाळेजवळ, सदाशिव पेठेत पुष्करणी हौदाजवळ, फडके हौद या ठिकाणी स्टॅन्ड असत. प्र. के. अत्रे लिहितात, ''बुधवार चौक (दगडूशेठ गणपती जवळील चौक) ही टांगेवाल्यांची 'गंगोत्री' आहे, तर रेल्वे स्टेशन हा त्यांचा 'बंगालचा उपसागर' आहे असे समजावयास पाहिजे.’’ घोड्यांना तहान लागल्यास पाण्याची सोयसुद्धा पुष्करणी हौद, फडके हौद, डुल्या मारुतीजवळील हौद अशा अनेक ठिकाणी केलेली असे.


एका सर्वेनुसार १९३८ सालादरम्यान पुण्यात ५९४ च्या आसपास टांगे पुण्यात होते. त्यात क्लास १ आणि क्लास २ अशी विभागणी टांगेवाल्यांमध्ये केलेली आढळते. टांगेवाल्यास लायसन्स काढावे लागे आणि प्रतिवर्षी त्यामागे लायसन्स मागे फी भरवावी लागे. लायसन्स म्हणजे मेटल प्लेट्स टांग्यावर बसविल्या जात. तसेच त्याला टांग्याचा व्हील टॅक्स (Wheel Tax) भरावा लागे. टांग्याची तपासणी देखील संबंधित निरीक्षकाकडून वर्षातून २ वेळेस होत असे. टांगा योग्य स्थितीत ठेवण्यासाठी टांग्यावर १०० ते १५० रुपये खर्च टांगेवाल्यास करावा लागे. टांग्यांच्या चालकास दरवर्षी नवीन पोशाख घ्यावा लागे. २५ रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत घोडे मिळत असत. छोटे घोडे टांग्यांसाठी जास्त उपयोगी पडत. टांग्याची किंमत २५० रुपये आसपास असे. जुना टांगा १५० किंवा त्याहीपेक्षा कमी किमतीत मिळे. टांग्यांचे स्पेअर पार्टस देखील पुण्यात मिळत असत.

.

छायाचित्र - नेट साभार

पुण्यात बससेवा सुरु होणार होती तेव्हा टांगेवाल्यांनी संप पुकारून बससेवेला विरोध केला होता. या मुद्द्यावरून पुण्यातील तत्कालीन वातावरण चांगलेच तापले होते. १७ मे १९३९ रोजी पुणे नगरपालीकेचे अध्यक्ष टांगेवाल्यांच्या नेत्यांशी विचार विनिमय करणार होते. त्या वेळी येथील ५०० टांगेवाले मिरवणुकीने विश्रामबाग वाड्यातील सभागृहात दाखल झाले. त्या वेळी टांगेवाल्यांच्या पुढाऱ्यांनी सांगितले, ''बस सर्विसची आवश्यकता असणारे लोक फार थोडे आहेत. त्यांच्यासाठी गावांतील सहस्त्रावधी लोक बेकार करू नका. शिवाय बसमुळे पुष्कळ पैसा परदेशात जाणार आहे.''


महानगरपालिकेच्या बससेवेच्या उपक्रमाचे स्वागत करताना त्यावरील आक्षेपांचा समाचार घेताना काँग्रेस पक्षाचे नेते प्र. के. अत्रे यांनी ३०-८-१९३९ च्या नगरपालिकेच्या सभेतील आपल्या भाषणांत म्हणाले, ''हल्ली शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नगरांत बराच बदल झाला असून या शहराचे बहुतेक कॉर्पोरेशन होईल. पुणे शहरांत लष्कर व सबर्बन भाग सामील करून शहराचे कॉर्पोरेशन करावे, अशी योजना आमच्यापुढे आहे व त्याबाबत सरकारकडे लवकरच आम्ही एक शिष्टमंडळही नेणार आहोत. जगात दळणवळणांची साधने दिवसेंदिवस वाढत चालली आहेत व जग एक होत चालले आहे. त्वरित गतीची साधने निघू लागली आहेत. मुंबई व अहमदाबाद शहरांत बरीच प्रगती झाली आहे. काय आपण असेच मागे राहणार ? गती हे प्रगतीचे लक्षण आहे. गती वाढल्यास प्रगती वाढतेच. हा संक्रमणावस्थेचा काळ आहे. टांगेवाल्यांवर जर कोणी अन्याय करीत असेल तर तो काळ करीत आहे ; आम्ही नाही. दिवसेंदिवस जीवन अधिक कष्टाचे होत चालले आहे. पूर्वी बैलगाडी होती. नंतर टांगा आला. एके काळी मेणे व पालख्या होत्या. उद्या कदाचित विमाने येतील. हे सर्व काळ घडवून आणतो. ड्रेनेज सुरु झाल्यावर कितीतरी लोकांच्या नोकऱ्या सुटल्या. पुणेरी पगडी गेल्या म्हणून कितीतरी पगडबंदांचे नुकसान झाले. हा सर्व काळाचा महिमा आहे. काळात बदल होत चालला आहे. याकडे त्यांनी लक्ष पुरवावे. आपण गावातील वातावरणापासून अलिप्त राहा असे माझे सांगणे आहे.''


पुण्यातील टांगेवाल्यांपैकी कै. बा. रा. शिंदे उर्फ बाबुराव टांगेवाले हे प्रसिद्ध होते. ते मोठे क्रिकेट शौकीन होते. हा माणूस पुण्यात क्रिकेटचा सामना असेल व्यवसाय सोडून मॅच बघायला जात असे. जो खेळाडू धावांचे शतक काढेल त्या खेळाडूस मैदानात धावत जाऊन हार घालीत असे. अनेक क्रिकेटपटूंकडून त्याचे कौतुक, सत्कार झाले होते. पुण्यात बाबुराव टांगेवाल्यांसारख्या शौकीन माणसांची आजही कमी नाही. परंतु या टांगेवाल्याच्या नशिबी शेवटी हलाखीची परिस्थितीच आली.

पुण्यात पद्मावती जवळ 'टांगेवाला कॉलनी' नावाची कॉलनी सुद्धा बघायला मिळते. २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात पावसाळ्यात आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी टांगेवाला कॉलनी आणि लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही कॉलनी पानशेत पुरानंतर वसली आहे असे कळते. तिथे लग्न, मुंज यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बग्ग्या व घोडे सांभाळले जातात.

---------------------------------------------------------------------------------

संदर्भ : 

पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ - श्री. मा. प. मंगुडकर, पुणे महानगरपालिका, १९६०
आधीच पुणे गुलजार - वि. ना. नातू
पुण्यभूषण दिवाळी अंक २०१५ – पुणेरी टांगेवाले - प्र. के. अत्रे
---------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय... तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदी करण्याची ऑनलाइन लिंक -

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
---------------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. शिवाजीनगरहुन पिंपरीला जाण्यासाठी खुशाल ३५० रुपये भाडे मागणाऱ्या रिक्षेवाल्यानी उद्या मेट्रो झाल्यावर संप न पुकारल्यास नवल नाही 😄

    ReplyDelete
  2. डेक्कन जिमखान्यावर जो रस्ता आहे त्याचे नाव भांडारकर इंस्टिट्यूट रस्ता असे आहे,भांडारकर रस्ता हे बोलताना वापरले जाते. प्रसिद्ध विद्वान,संशोधक,समाज सुधारक डॉ.रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मरणार्थ ज्या प्राच्यविद्या संशोधन संस्थेला (Bhandarkar Oriental Research Institute) त्यांचे नाव दिले आहे ती (बोरी या लघुनावाने जगप्रसिद्ध संस्था) विधी महाविद्यालय रस्त्यावर सदर भांडारकर इंस्टिट्यूट रस्त्याच्या शेवटाला आहे.पुणे रेल्वे स्थानकानजिकच्या रस्त्याला त्याच सर भांडरकरांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव दिले होते.ते नाव बदलून ढोले पाटील रस्ता असे नाव का दिले याची कल्पना नाही.

    ReplyDelete

INSTAGRAM FEED

@suprasadp