जाणून घ्या पुण्यातल्या ३ वेगवेगळ्या जोगेश्वरी देवी मंदिरांबद्दल....

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर 

३३, बुधवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ पुण्याची ग्रामदेवी 'तांबडी जोगेश्वरी' मंदिर आहे. सध्या भर वस्तीत असलेला हा भाग पूर्वी छोट्याशा असलेल्या पुण्यापासून लांब होता. तेव्हा या भागातून आंबील ओढा वहात असे. त्याकाळी ओढयाकाठी देवीची मूर्ती होती. नानासाहेब पेशव्यांनी पुढे येथून वाहणाऱ्या  आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. ग्रामदेवीचा मान लाभलेल्या या देवीचे ३१ जानेवारी २००७ मध्ये शेंदूराचे कवच निखळून पडले आणि जोगेश्वरीचे मूळ रूपाचे दर्शन झाले. ते निखळलेले कवच मंदिरात काचेच्या पेटीत पाहायला मिळते. देवीची मूळ मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे. देवीच्या वरच्या उजव्या हातात डमरू व डाव्या हातात त्रिशुळ आहे. खालच्या उजव्या हातात मुंडके व डाव्या हातात कमंडलू धरलेले आहे. मूर्ती साधारण पाऊण मिटर उंचीची आहे. योगेश्वरी म्हणजेच जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. महिषासूराच्या बारा सेनापतींपैकी देवीने ताम्रासुराचा वध केला म्हणून किंवा तांबड्या रंगाच्या ताम्रवर्णी देवीस 'तांबडी जोगेश्वरी' नाव पडले असे म्हटले जाते.

तांबडी जोगेश्वरी देवीचे कवच निखळले नव्हते तेव्हाचे एक जुने छायाचित्र
( छायाचित्र सौजन्य - मुकुंद देशपांडे सरनाईक )

२००७ साली शेंदूर कवच निखळल्यानंतर समोर आली देवीची मूळ मूर्ती 

तांबडी जोगेश्वरीचे हे मंदिर फार मोठे नाही. मंदिर १८व्या शतकात बांधले गेले असावे. मंदिराची रचना गाभारा आणि सभामंडप अशी आहे. सभामंडपात डाव्या बाजूस नागप्रतिमा व उजवीकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. सभामंडपाबाहेर दगडी सिंह पहायला मिळतो. १८१० सालच्या दुसऱ्या बाजीरावांनी दक्षिणा ठेवलेल्या देवतांच्या यादीत या जोगेश्वरीचा 'योगेश्वरी तांबडी' असा उल्लेख मिळतो. मंदिराच्या चारही कोपऱ्यात असलेल्या रामेश्वर, त्रिंबकेश्वर, गणपती व विष्णू देवता दिसतात. त्या देवतांपुढे सुद्धा १८१० साली दक्षिणा ठेवली गेली होती. मूळचे कोकणातले असलेले पेशवे कुटुंबियांचे कुलदैवत म्हणजे श्रीवर्धनची योगेश्वरी. पुण्यात आल्यावर पेशव्यांनी जोगेश्वरीला आपली योगेश्वरी मानले असे म्हटले जाते. पेशवे या देवीच्या दर्शनास येत असत.

एरवी आपल्याला वरीलप्रमाणे देवीचे मुखवटा परिधान केलेले असे दर्शन घडते.

तांबडी जोगेश्वरी मंदिरातील विष्णूमूर्ती देखणी आहे. छोटे मारुती मंदिर देखील येथे आहे. देवीसमोर मंदिराबाहेर एक छोटी जुनी दगडी दीपमाळ आहे. येथे पूर्वी अजून एक दीपमाळ होती असे कळते. मंदिरापाशी असलेली कमान ४ ऑक्टोबर २००५ साली उभारण्यात आलेली आहे. मंगलकार्याची अक्षत पुणेकर प्रथम ग्रामदैवत कसबा गणपती समोर ठेवतात. त्यानंतर मग ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी पुढे अक्षत ठेवली जाते. मुंज व लग्न झाल्यानंतर जोगेश्वरी देवीचे दर्शन आवर्जून घेतात. नवरात्रात येथे देवीच्या विविध अवतारांच्या मूर्ती वाहनांसह बसविण्यात येतात. तेव्हा महिलावर्गाची देवीस ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी होते. दसऱ्याला देवीची पालखीतून मिरवणूक निघण्याची परंपरा आहे. बेंद्रे घराण्याच्या गेल्या कित्येक पिढ्या मंदिराचे पूजारी आणि व्यवस्थापक आहेत.

श्री काळी जोगेश्वरी मंदिर -

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यानजीक २७५, बुधवार पेठेत लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ 'काळी जोगेश्वरी' मंदिर आहे. या दत्त मंदिराच्या उजव्या बाजूस जो रस्ता जातो त्याच्या सुरवातीलाच हे मंदिर डाव्या हाताला आतील बाजूस आहे. कमीतकमी २०० वर्षे जुने हे देवीमंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातली असल्याने किंवा या भागाला पूर्वी काळे वावर असे म्हटले जात असल्याने नाव पडले असावे 'काळी जोगेश्वरी'. चार हात असलेली ही देवीमूर्ती बैठी आहे. साधारण तीन फूट उंचीच्या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, पद्म असून एक हात अभयमुद्रेत आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे देवीस तीन नेत्र आहेत. सध्याची मूर्ती १९५४ साली राजस्थानातील कारागिरांकडून बनवून घेतलेली आहे.

काळी जोगेश्वरी देवी

गाभाऱ्यासमोर सभामंडप असून तिथे देवीसमोर गणपती बघायला मिळतो. ही एक दुर्मिळ बाब या मंदिराविषयी आपण म्हणू शकतो. तसेच गणपतीच्या एका बाजूस शंकराचे तर एका बाजूस काळभैरवाचे मंदिर आहे. तसेच गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस औदुंबर वृक्ष असून त्याखाली दत्तगुरूंचे मंदिर आहे. पेशवाईत दुसरे बाजीराव यांच्या काळात या देवीचा उल्लेख 'योगेश्वरी काळी' असा मिळतो. १८१० साली देवी आणि देवीपुढे असलेल्या गणपती समोर दक्षिणा ठेवली होती. नवरात्रात देवीला विविध वाहनांवर आरूढ केले जाते. गेल्या १०० वर्षांहून अधिक भिडे कुटुंबीय मंदिराची व्यवस्था पाहतात.

श्री पिवळी जोगेश्वरी मंदिर 

८८७, शुक्रवार पेठेत जेधे मॅन्शन पासून पुढे पंचमुखी मारुती मंदिराच्या डाव्या बाजूस 'पिवळी जोगेश्वरी' मंदिर आहे. मंदिराच्या स्थापनेचा उल्लेख मिळत नाही. परंतु कमीकमीत १०० वर्षे जुने हे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराची गाभारा आणि सभामंडप अशी रचना आहे. येथील अष्टभुजा देवीचे स्फटिक पिवळे आहे, म्हणून देवीस 'पिवळी जोगेश्वरी' म्हटले जाते. लग्न ठरण्यासाठी येथे पिवळ्या गोष्टी (उदाहरणार्थ - हळद लावलेले तांदूळ) ठेवल्या जातात, म्हणूनही या देवीस 'पिवळी जोगेश्वरी' असे म्हटले जाते. देवीच्या एका बाजूस देवीचा स्वयंभू तांदळा व दुसऱ्या बाजूस गणपती बघायला मिळतो. नवरात्रात नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ केले जाते. लोकमान्य टिळकांचा या मंदिराशी संबंध आला होता. महाजन कुटुंबीयांचे हे खाजगी देवस्थान आहे. श्री. दिनेश कुलकर्णी हे मंदिराचे व्यवस्थापन पाहतात.

पिवळी जोगेश्वरी

---------------------------------------------------------------------------------
संदर्भ : 
१) मुठेकाठचे पुणे - प्र. के. घाणेकर
२) पुणे शहराचा ज्ञानकोश - शां. ग. महाजन
३) दुसरे बाजीराव पेशवे - वाड डायरीज
---------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय... तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदी करण्याची ऑनलाइन लिंक -

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp