लोकमान्य टिळक संग्रहालय, केसरीवाडा

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करणारे 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक. त्यांचे आणि पुणे शहराचे नाते अतूट आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुण्यनगरीतील अनेक वास्तू पावन झाल्या आहेत. त्यांचे जिथे प्रत्यक्ष वास्तव्य होते, त्या नारायण पेठेतील पूर्वीच्या गायकवाड वाड्यात म्हणजेच आजच्या केसरीवाड्यात (टिळकवाडा) 'लोकमान्य टिळक संग्रहालय' आहे. इथे टिळकांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह, माहितीफलक व जीवनासंबंधीच्या अनेक गोष्टी पहायला मिळतात. केसरीवाड्यात प्रवेश केल्यावर समोरच गणेशमूर्ती व टिळकांचा पूर्णाकृती पुतळा दिसतो. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर संग्रहालय आहे. २२ जानेवारी १९९९ रोजी संग्रहालयाचे श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते उदघाटन झाले. या संग्रहालयाची संकल्पना व निर्मिती 'केसरी मराठा ट्रस्ट' आणि टिळक कुटुंबीय यांनी केलेली आहे.

संग्रहालयातील लो. टिळकांचे तैलचित्र   

संग्रहालयाकडे जाताना जिन्यात टिळकांची व त्यांच्या सहकाऱ्यांची छायाचित्रे दिसतात, तसेच काही माहितीफलक लावले आहेत. त्यामध्ये केसरीच्या संपादकांची १८८७ ते २००१ सालापर्यंतची यादी आहे. संग्रहालयात शिरल्यावर समोरच लोकमान्य टिळकांचे मोठे तैलचित्र दिसते. तिथेच त्यांच्या पवित्र अस्थी व रक्षा जतन करून ठेवल्या असून होमरूल लीगच्या चर्चेसाठी वापर केलेले त्यांचे गोल टेबल आहे. लो. टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी अनेकवेळा याच टेबलावर चर्चा केल्या होत्या. त्यांना मिळालेले अनेक मानपत्र तिथे बघायला मिळतात.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ या दिवशी कोकणातील रत्नागिरीमध्ये झाला. चिखलगाव हे टिळकांचे मूळ गाव. रत्नागिरीतील त्यांचे जन्मस्थान गोरेवाडा व चिखलगाव येथील राहत्या घराचे छायाचित्र संग्रहालयाच्या सुरवातीला प्रदर्शित केले आहे. टिळकांची जन्मकुंडली, कायद्याच्या पदवीचे प्रमाणपत्र व वकिलीची सनद अशा अनेक गोष्टींची संग्रहालयात मांडणी केलेली आहे. टिळकांच्या तरुणवयातल्या छायाचित्रासह त्यांचे वडील, आजोबा व काकांचे छायाचित्र पहायला मिळते. शिवाय कुटुंबाचे छायाचित्र बघायला मिळते. टिळकांचे कुलदैवत असलेल्या कोकणातील लक्ष्मी केशवाच्या मूर्तीचे छायाचित्र संग्रहालयात बघता येते.

जुन्या वाड्यातील लोकमान्य टिळकांच्या अभ्यासिकेची हुबेहूब प्रतिकृती येथे सुहास बहुलकर यांनी बनविली आहे. या अभ्यासिकेत टेबल, खुर्च्या, पलंग, कपाट, पुस्तके पहायला मिळते. तिथे टिळक अभ्यास करताना दिसतात. मंडाले कारागृहाची प्रतिकृती संग्रहालयात साकारली आहे. १९०८ ते १९१४ या वर्षांदरम्यान टिळक या कारागृहात होते. सध्या मंडाले हे म्यानमार या देशात आहे. सहा वर्षे मंडालेच्या कारागृहात असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिले, ते ऐतिहासिक टेबल आपल्याला येथे बघायला मिळते. २ नोव्हेंबर १९१० ते ३० मार्च १९११ या ५ महिन्यात टिळकांनी भगवद्गीतेवर ९०० पानांचा अजरामर ग्रंथ लिहिला. त्यांनी स्वतः वापरलेली पुस्तके देखील बघायला मिळतात. पुण्यातील येरवडा कारागृहात टिळक काही दिवस होते. तेथील खोलीचे छायाचित्र येथे आहे.


संग्रहालय प्रवेशद्वार

स्वामी विवेकानंद व लोकमान्य टिळकांची पुण्यात जेथे भेट झाली, त्या सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील विंचूरकर वाड्याचे छायाचित्र संगहालयात पहायला मिळते. येथे टिळकांच्या घरी स्वामी विवेकानंद राहिले होते. विंचूरकर वाडा आज मात्र अस्तित्वात नाही. या विंचूरकर वाड्यात टिळक लॉ क्लास घेत असत. त्या वाड्यातले टिळकांचे व त्यांच्या विद्यार्थी आणि सहकाऱ्यांबरोबर एक छायाचित्र येथे आहे. छत्रपती शिवराय, गोपाळ गणेश आगरकर, वासुदेव बळवंत फडके यांचीही छायाचित्रे पाहायला मिळतात. लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत त्या विनायक रामचंद्र पटवर्धन म्हणजेच महर्षी अण्णासाहेब पटवर्धन व लोकमान्य टिळक या दोघांचे छायाचित्र येथे बघायला मिळते. टिळकांची पत्नी सौ. सत्यभामाबाई टिळक यांचे मोठे तैलचित्र येथे संग्रहालयात आहे.

संग्रहालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा ध्वज येथे जतन करून ठेवला आहे. मादाम कामा यांनी तो २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आपल्या भाषणापूर्वी फडकविला होता. त्या ध्वजाच्या मध्यभागी 'वंदे मातरं' लिहिलेले आहे. आज जिथे केसरीवाडा आहे तेथे पूर्वी सरदार गायकवाड वाडा होता. टिळक १९०५ साली गायकवाड वाड्यात रहायला आले. त्या गायकवाड वाड्याचे छायाचित्र संग्रहालयात दिसते. टिळकांनी जेथे पुण्यात शिक्षण घेतले त्या डेक्कन कॉलेजचे छायाचित्र बघायला मिळते. न्यू इंग्लिश स्कुल स्थापण्यात टिळकांचा पुढाकार होता. त्याचे देखील येथे छायाचित्र बघायला मिळते. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयाचे छायाचित्र देखील आहे. ‘गणिती’ असलेल्या लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते.

अभ्यासिका

लोककल्याणासाठी टिळकांनी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘केसरी’ व ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे सुरु केली होती. इंग्रजीतून 'मराठा' सुरु झाले २ जानेवारी १८८१ या दिवशी तर मराठीतून 'केसरी' ४ जानेवारी १८८१ या दिवशी सुरु झाले. त्या दोन्ही वृत्तपत्रांचे प्रथमांक येथे पाहायला मिळतात. समाजमनात एकी निर्माण होऊन तो जागृत व्हावा, असा उद्देश ठेऊन लोकमान्यांनी दोन राष्ट्रीय उत्सव सुरु केले. पहिला गणेशोत्सव आणि दुसरा शिवजयंती. केसरीवाड्यातील गणपतीचे आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीचे छायाचित्र व माहिती येथे दिसते. मुंबईतील शांतारामाच्या चाळीत गणेशोत्सवा दरम्यान टिळकांची सभा झाली होती. त्याचे छायाचित्र येथे बघायला मिळते. लोकमान्यांचे विचारधन संग्रहालयात ठिकठिकाणी वाचायला मिळते.

लोकमान्यांची दैनंदिन वापरातील भांडी येथे ठेवण्यात आलेली आहेत. राजद्रोहाच्या खटल्यावेळी टिळकांनी जे फाउंटन पेन वापरले होते ते येथे संग्रहालयात आहे. लोकमान्यांची प्रकाशित झालेली टपाल तिकीट, नाणी दिसतात. टिळक घराण्याचा वंशवृक्ष एका फलकाद्वारे पाहता येतो. तेथेच टिळक कुटुंबीयांची छायाचित्रेही दिसतात. येथील केसरीवाड्यातील गणेशोत्सवात वापरली जाणारी पालखी आपले लक्ष वेधून घेते. पहिला राजद्रोह खटला, ताई महाराज प्रकरण, डोंगरी तुरुंगातील १०१ दिवस अशा टिळकांच्या आयुष्यातील अनेक घटनांबद्दल मराठी आणि इंग्रजीत मजकूर लावलेला आहे. टिळकांनी लिहिलेली व त्यांना मिळालेली अनेक पत्रे पहायला मिळतात. लाला लजपतराय यांनी लोकमान्य टिळकांना पाठवलेले पत्र येथे पहायला मिळते. लोकमान्यांचा अखेरचा आजाराबद्दल एक माहिती फलक लावला आहे. १ ऑगस्ट १९२० लोकमान्य टिळकांचे निधन झाले. सरदारगृह मुंबई येथील त्यांच्या अंत्ययात्रेचे दर्शन घडवणारी काही क्षणचित्रे पाहायला मिळतात.

मंडाले कारागृह प्रतिकृती

संग्रहालयातील माहितीफलक व छायाचित्रे

भारतातील लोकमान्य टिळकांची स्मारके संग्रहालयात बघायला मिळतात. जानेवारी १९७३ मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीत लोकमान्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले होते. त्या पुतळ्याचे छायाचित्र इंदिरा गांधींसमवेत दिसते. अजून एक टिळकांबाबतचे विशेष स्मारक मुंबईच्या उच्च न्यायालयात लावलेल्या संगमरवरी फलकातून बघायला मिळते. न्यायालयात शक्यतो न्यायमूर्तींचे निर्णय किंवा उद्गार लावले जातात. टिळकांच्या बाबतीत एक वेगळी गोष्ट घडली. राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना शिक्षा झाली तेव्हा त्यांनी जे उद्गार काढले ते न्यायालयात लावले गेले. येथे छायाचित्रातून ते बघायला मिळते. शिवाय टिळकांच्या सिंहगडावरील बंगल्याचाही स्मारकात समावेश होतो.

आज आपण भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या प्रयत्नात आहोत. परंतु टिळकांच्या पुढाकाराने स्वदेशी मालाच्या विक्रीकरिता १९०६ मध्ये दुकाने सुरु करण्यात आली होती. 'बॉम्बे स्वदेशी को. ऑप. स्टोअर्स कंपनी' नावाने ही दुकाने सुरु करण्यात आली होती. त्याचे एक छायाचित्र येथे बघायला मिळते. तसेच त्यासंबंधीची एक नोटीसही येथे लावलेली आहे. 'गीतारहस्य' व 'द ओरायन' या टिळकलिखीत दोन ग्रंथांचे हस्तलिखित इथे पहायला मिळते. १९१७ सालचे अकोला येथील बोटक्लब मधील टिळकांचं एक छायाचित्र बघायला मिळते. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व, कार्य व जीवनप्रवास यांचा उलगडा करणारे हे संग्रहालय पुरेसा वेळ राखून नक्की पहावे, असेच आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ - 
१) पुण्यातील संग्रहालये - डॉ. मंदा खांडगे 
२) कर्मयोगी लोकमान्य टिळक - डॉ. दीपक टिळक यांचा केसरीमधील लेख
३) मुठेकाठचे पुणे - प्र. के. घाणेकर

----------------------------------------------------------------------------------------------------

वेळ – सकाळी १० ते १ व दुपारी ३ ते ६ (आठवड्यातले सर्व दिवस चालू)

पत्ता - केसरीवाडा, न. चिं. केळकर रस्ता, नारायण पेठ, पुणे

तिकीट – निशुल्क

------------------------------------------------------------------------------------------------------

© सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp