पूना गेस्ट हाऊस


पुणे जसे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे तशी येथील खाद्यसंस्कृती देखील जगप्रसिद्ध आहे. भारतातल्या विविध प्रांतातलेच नाही तर देशोदेशीचे उत्तम खाद्यपदार्थ पुण्यात सध्या मिळायला लागले आहेत. इथली अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक चव तर खवय्यांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असते. त्यामध्ये बराच वरचा नंबर लागेल तो 'पूना गेस्ट हाऊस' सुप्रसिद्ध हॉटेलचा. या उपहारगृहाची अजून खासियत म्हणजे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील कलाकारांचा या वास्तूशी संबंध आला. अशा या 'पुणेरी' पूना गेस्ट बद्दल आज आपण जाणून घेऊयात.


पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता   (Image Source - Google)


बुधवार पेठेत असलेले हे 'पूना गेस्ट हाऊस' लक्ष्मी रस्त्यावर आहे. बेलबाग चौकाकडून गणपती चौकाकडे आपण जाऊ लागलो की मध्यात उजवीकडे दिसते पूना गेस्ट हाऊस. येथील एका जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर हे उपहारगृह आहे. मूळचे कोकणातील नरहर दामोदर तथा नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ साली पूना गेस्ट हाऊसची स्थापना केली. तत्पूर्वी नानासाहेब सरपोतदार स्वतः मूकपट, नाटकांची निर्मिती करीत असत. त्यांचा आर्यन फिल्म स्टुडिओ नावाचा एक स्टुडिओ देखील होता. परंतु नाटक चित्रपटांना जसा मंदीचा काळ आला तसे ते हॉटेल व्यवसायाकडे वळले. 

पूना गेस्ट हाऊस सुरु झाले तेव्हा इथले विशेष आकर्षण होते 
ते 'बाजीराव चिवडा''मस्तानी मिसळ ' या पदार्थांचे.

दडपे पोहे   (Image Source - Google)

निवासाची सोय येथे असल्याने पूर्वी कलाकार पुण्यात आले की येथे रहात असत. या पाहुणे मंडळींनी नानासाहेब यांनी बनविलेल्या अनेक चित्रपटात कामही केले होते. बालगंधर्व, दादा कोंडके, पु. ल. देशपांडे, देवानंद अशी दिग्गज मंडळी येथे आलेली आहेत. आचार्य अत्रे यांनी पण एकदा येथे दुपारचे भोजन केले होते. जुन्या काळात पुण्यात आलं की त्यांच्यासाठी हे जणू हक्काचं स्थान. फक्त कलावंतचं नव्हे तर इतर क्षेत्रातील मंडळींना आश्रय या वास्तूने दिला आहे. फिरती चित्रपटगृहे म्हणजेच 'टूरिंग टॉकीज'ची मंडळी पुण्यात आल्यावर निश्चितपणे येथे येत असत. विविध क्षेत्रातील नामवंतांना अखेरच्या काळात आधार दिला तो याच पूना गेस्ट हाऊसने. १९५२-५३ मध्ये राजधानी दिल्लीत पूना गेस्ट हाऊसची शाखा काढली गेली. काही वर्षे ती चांगली चालली. तसेच माथेरानलाही एक शाखा होती. 

१९६१च्या पानशेत पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र ‘पूना गेस्ट हाऊस’ने सुरु केले होते. त्या काळरात्री पिठलं भाताचे जेवण देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. अशा ऐतिहासिक पूना गेस्ट हाऊसच्या सरपोतदारांची तिसरी पिढी सध्या उपहारगृह सांभाळत आहे. आउटडोअर केटरिंग सर्व्हिसही येथे उपलब्ध आहे. सांस्कृतिक कार्यक्रम देखील उपहारगृहाच्या हॉलमध्ये होतात. पिठलं भाकरी, भरली वांगी, बिरडयाची उसळ, मसाले भात, कोथिंबीर वडी, आमरस, उकडीचे मोदक असे विविध प्रांतातले अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर पूना गेस्ट हाऊसला पर्याय नाही. थाळीसह येथे दडपे पोहे, थालीपीठ व मिसळ हे पदार्थही आवडीने खाल्ले जातात. ग्राहकांचे वर्षानुवर्षे अतिथ्य करण्याची परंपरा येथे आहे.

थाळी   (Image Source - Google)

---------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय... तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, BookGanga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य - अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा - टिळक रस्ता, बुकगंगा - डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp