प्लेग, पुणे आणि उंदीर

पुण्यात एका रोगाने १९व्या शतकाच्या शेवटी व त्यानंतर पुण्यात थैमान घातले होते. त्याचे नाव म्हणजे 'प्लेग'. १८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळीही अशाच पद्धतीने संपूर्ण पुणे शहर रिकामे पडले होते. कारण प्लेगवर उपाय नसल्याने तशी परिस्थिती होती. मोठ्या संख्येने दररोज माणसे मरत. क्रांतीज्योती 'सावित्रीबाई फुले' व ज्यांच्या नावाने दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो असे 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई' यांचा मृत्यू प्लेगने झाला होता. प्लेगशिवाय कॉलरा, देवी, मलेरिया असे अनेक रोग त्याकाळात आढळून येतात. परंतु त्यात प्लेगने सर्वात जास्त रौद्र रूप धारण केले होते. उंदरांमुळे प्लेगची साथ पसरत असल्याने तत्कालीन प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या गेल्या. त्या कोणत्या ते आज आपण जाणून घेऊयात....

प्लेग आटोक्यात आणण्यासाठी पुणे नगरपालिकेने महत्वाची एक गोष्ट केली ती म्हणजे मूषकसंहार करण्यासाठीच्या उपाययोजना. इतर शहरातही त्या करण्यात आल्या होत्या. कारण उंदीर हेच प्लेगचे माध्यम होते. त्यांच्या अंगावरील पिसवांपासून प्लेगच्या जंतूंचा फैलाव होतो. उंदीर पकडण्यासाठी नगरपालिकेकडून दोन हजार पिंजरे निरनिराळ्या ठिकाणी लावले होते. त्यात कांदे, काकडी, कोथिंबीर यांसारखे पदार्थ खाण्यास ठेवत. पकडलेले उंदीर व घुशी पर्वतीजवळील नगरपालिकेच्या जागेत पुरून टाकत. १९११ मध्ये नगरपालिकेने जवळपास ४० हजार उंदीर पकडून नष्ट केल्याचे समजते. पुढच्या काळात तर केवळ साडेसात महिन्याच्या काळात शहरातील १,०६,६४४ जिवंत उंदीर पकडण्यात आले. 

काही वेळेस नगरपालिकेने पिंजरे दिले तरी लोकांमध्ये उदासीनता दिसे. त्याकरिता नगरपालिकेने बक्षिसाची योजना केली. उंदीर पकडून आणून देणाऱ्यास उंदरामागे १ आणा बक्षीस जाहीर केले होते. योजनेकरिता दरवर्षी १५० रुपये खर्च होत. मूषक विच्छेदनाचे (Dissection) कामही सुरु करण्यात आले होते. विच्छेदन कसे करावे त्यासाठी एका डॉक्टरांना मुंबईला शिक्षणाकरिता पाठविले होते. तो डॉक्टर मग शहरातील काही उंदरांचे विच्छेदन करी व त्याप्रमाणे शहरात उपाययोजना सुरु करण्यात येई. उंदरांचा नायनाट करताना नगरपालिकेस काही बिकट प्रश्नांना सामोरे जावे लागत. पुण्यातील व्यापारी पेठा म्हणजे भवानी, नाना व महात्मा फुले पेठ (गंज पेठ). तेथे व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या दुकानांमुळे जास्त उंदरांचा प्रादुर्भाव असे. येथील एका दुकानात पिंजऱ्यात ८० उंदीर घुशी सापडल्या होत्या. नगरपालिकेची माणसं जेव्हा ते पिंजरे घेण्यास आले तेव्हा त्या दुकानदाराने पिंजरे त्यांच्याजवळ देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्यांना वेढा घातला गेला. ते सर्व उंदीर नंतर शेजारच्या गटारांत सोडून देण्यात आले. नागरिकांच्या धार्मिक श्रद्धांमुळे त्याकाळी असा अडथळा आला होता. एके वर्षी नाना पेठेत एका सरकारी कोठारात ५,४५९ उंदीर फक्त १० दिवसात पकडले होते.

पुढच्या काळात सायनोगॅसिंगचा प्रयोग केला गेला. तो म्हणजे उंदरांच्या बिळात विषारी वायूचे फवारे मारणे. त्यामुळे बिळात असलेले सर्व उंदीर मारून जात. यामुळे पुण्यातील उंदरांचा नाश अल्पावधीतच झाला. या विषारी वायूचा फवारा करताना जर तो माणसाच्या नाका-तोंडात गेल्यास काय होईल, म्हणून या पद्धतीस पुण्यात विरोध झाला. मात्र हा वायूने मानवास धोका नाही हे लक्षात आल्यावर भीती दूर झाली. नगरपालिकेने २१ हजार खर्चून १५,२५८ खोल्यांमध्ये सायनोगॅसिंग केले.

साधारण २० वर्षे प्लेग नव्हता परंतु १९३० नंतर प्लेगची चाहूल लागली होती. तेव्हा लोकांच्या घरी मोठा घुशी दिसू लागल्या होत्या. ''आगामी प्लेगच्या साठीची ही पूर्व सूचना आहे'', असे नागपालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. खंबाटा यांनी सांगितले. ते भाकीत खरे ठरले व १९३३ साली १,०७९ लोक प्लेगने मृत्युमुखी पडले. साथीची तीव्रता इतकी असायची की कधी कधी तर माणसं मेल्यावर स्मशानात जागा मिळत नसायची.

प्लेगदरम्यान इंग्रज अधिकारी रँडच्या अत्याचाराचा बदला चाफेकर बंधूंनी पुण्यात घेतला

नोव्हेंबर १९५० पासून महापालिकेने शहरभर डी. डी. टी. मारण्याची मोहीम चालविली. त्याचे वैशिष्ट्य असे की उंदीर न मारता फक्त त्यांच्या अंगावरील रोगजंतूवाहक पिसवा मारून जातात. त्यामुळे उंदरांपासून प्लेगचा धोका राहिला नाही. प्लेगचे उच्चाटन झाले. हा उपक्रम नंतर देशभर राबविला परंतु सर्वप्रथम पुण्यात झाल्याचे कळते. या उपाययोजनेनंतरही उंदरांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून नगरपालिकेने विषारी गोळ्या व पिंजरे अल्प किमतीत उपलब्ध करून दिले. कालांतराने प्लेगची साथ आटोक्यात आली. १९५० नंतर पुण्यातून प्लेग हद्दपार झाला होता. तेव्हा पुणेकरांनी सुटकेचा निश्वास घेतला.
-------------------------------------------------------------------------------

पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक


-------------------------------------------------------------------------------

14 comments:

 1. खूपच छान माहिती दिली सर, धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. वाचल्याबद्दल आणि कमेन्टबद्दल तुमचेही धन्यवाद 😊👍👍

   Delete
  2. सर, आम्ही प्लेगच्या साथीविषयी फक्त ऐकून होतो.. खरोखरच तो किती भयानक काळ असेल. सद्यस्थिती पाहता कोरोणाविषयी आपण खूप जागरूक असणे अत्यावश्यक आहे..!

   Delete
  3. अतिशय योग्य बोललात 😊👍

   Delete
 2. आपण स्वत: काळजी घ्यावी पहिल्यांदा... आणी मग श्रेय जरूर सर्वसमाजाला द्यावे.

  ReplyDelete
  Replies
  1. योग्य ती काळजी घेत आहे ☺️

   Delete
 3. पद्माकर खडतरेMarch 27, 2020 at 9:34 PM

  मस्त माहिती. संकलित करायला घेतलेली मेहनत दिसते. शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. १८९७ चर्या साथीत तत्कालीन गोर्या सरकारने काय उपाययोजना केल्या होत्या.त्यास जनतेने कसा प्रतिसाद दिला.

  ReplyDelete
  Replies
  1. इंग्रजांनी अनेक अत्याचार केले नागरिकांवर या साथीत. रँडची हत्या याच दरम्यानची. बाकी विषय मोठा आहे. बघावं लागेल तपशिलात खोलात जाऊन.

   Delete
  2. आताच्या काळात (Lockdown) खुपच छान वाचनीय माहिती आहे...👌👌

   Delete
  3. धन्यवाद ☺️👍

   Delete
 5. खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...!!!!
  महापालिकेने शहरभर डी. डी. टी. मारण्याची उपाययोजना केली आणि ही उपाययोजना देशभर राबविली गेली, त्याची सुरुवात पुण्यापासून झाली हे माहित नव्हते. याबद्दल जरा विस्तृत माहिती देऊ शकाल का? म्हणजे, ही कल्पना कोणाची? उंदीर न मारता फक्त पिसवा मारून रोग आटोक्यात आणता येईल याचा शोध कोणी लावला?

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. DDT बदल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची माहिती नाही मिळू शकली. सापडल्यास कळवेन.

   Delete

INSTAGRAM FEED

@suprasadp