गोष्ट पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याची

पुण्यात अनेक थोरामोठ्यांचे पुतळे आपल्याला दृष्टीस पडतात. परंतू अशा गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. पुण्यातील काही पुतळे विशेष आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंग्रजांविरुद्ध "मेरी झांसी नही दूंगी" असे स्फूर्तिदायक उद्गार काढणाऱ्या झाशीच्या राणीचा पुतळा. तो पुतळा जंगली महाराज उर्फ जे. एम. रोडवर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आहे. पुतळा जेथे आहे त्या चौकाचे नामकरणही 'झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक' असे केले आहे. आज आपण त्या पुतळ्याबद्दल जाणून घेऊयात....

झाशीची राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव 'लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर' असे होते. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या या पराक्रमी स्त्रीचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ मध्ये मोरोपंत तांबे व भगिरथीबाई तांबे या मराठी दांपत्याच्या पोटी काशी येथे झाला. लहानपणीच युद्धशास्त्राचे प्रशिक्षण तिने घेतले होते. त्‍यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी १८४२ साली झाला. त्‍यांचे नाव विवाहानंतर लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. तेव्हापासून त्या 'झाशीची राणी' म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. ब्रिटीशांच्‍या 'ईस्‍ट इंडिया कंपनी' विरोधात झालेल्‍या १८५७ च्‍या स्‍वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी म्हणून त्यांची ओळख माहित आहेच. प्रखर स्वाभिमान व रणांगणावर शौर्य गाजविणाऱ्या महाराणी १७ जून १८५८ रोजी ग्वाल्हेरला इंग्रजांविरुद्ध लढताना धारातीर्थी पडल्या.

झाशीच्या राणीचा पुतळा ( IMAGE SOURCE - GOOGLE)

पुतळ्याच्या चौथऱ्याच्या मागील बाजूस आपल्याला एक संगमरवरी फलक दिसतो. तो १६ ऑगस्ट १९५७ साली १८५७च्या स्वातंत्र्यसमराची शताब्दी असताना तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बसविण्यात आली होती. हे स्मारक उभे राहण्यासाठी भारत सरकार व मुंबई राज्य, पुणे महानगरपालिका, कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि महाराणी लक्ष्मीबाईसाहेब झाशीवाले स्मारक समिती यांचा सहभाग होता.

दत्तकपुत्र दामोदराला पाठीशी बांधून अश्वारूढ झालेल्या या पुतळ्याचे उदघाटन १८ जून १९५८ मध्ये झाले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन झाले. शिवाय अंगावरील चिलखत, कमरेला अडकवलेली बंदूक, एका हातात धरलेली तलवार नजरेस पडते. १६ फूट उंच चबुतरा तर १४ फूट उंचीचा पुतळा आहे. मुंबईचे प्रख्यात भगवंतराव व नानाभाई गोरेगावकर हे बंधू या पुतळ्याचे शिल्पकार होते. 

मुंबईहून पुतळा पुण्यात आला तो मुंबई - सुरत - जळगाव - मनमाड - दौंडमार्गे रेल्वेने पुण्यात आणला. त्यामागचे कारण हे मुंबई-पुणे दरम्यानचे बोगदे टाळण्याचे होते. मर्दानी रूपातील या देखण्या पुतळ्याचा एकंदर खर्च रु. ९६,६४३ आला होता. अनावरण सोहळ्यास झाशीच्या राणीचे वंशज उपस्थित होते. पुतळ्याखाली असलेल्या कोनशिलेत मजकूर कोरलेला आहे. त्यात ''लक्ष्मीबाईसाहेब झांशीवाले स्मारक समिती द्वारा ही प्रतिमा पुणे महानगर पालिका यांस सादर समर्पण'' असे कोरलेले आहे.

कोनशिला

झाशी येथे पुतळा उभारल्यानंतर हा देशातील दुसराच पुतळा ठरला. मर्दासारखा वेष परिधान करून स्वातंत्र्यासाठी लढताना बलिदान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई या स्त्रीचा पुतळा आणि मराठी संगीत रंगभूमीवर आयुष्यभर स्त्रीची भूमिका करणारे नारायणराव राजहंस म्हणजेच 'बालगंधर्व' यांच्या नावाने रंगमंदिर असे हे जगातील एकमेव स्मारक एकाच ठिकाणी आहे. पु. ल. देशपांडे यांनी या वैशिष्ट्याचा उल्लेख बालगंधर्व रंगमंदिरच्या उदघाटनसमयी आपल्या भाषणात केला होता. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. एकेकाळी राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसर व बालगंधर्व रंगमंदिराचं प्रशस्त आवार छत्रपती संभाजी राजे उद्यानाचा एक भाग होता.

(उत्सुकांनी इतिहासकार द. ब. पारसनीस यांनी लिहिलेले झाशीच्या राणीचे चरित्र 'झाशीची राणी' हे पुस्तक जरूर वाचावे.)
---------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) मुठेकाठचे पुणे - प्र. के. घाणेकर
---------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp