राष्ट्रपित्याचे पुण्यातील स्मारक - आगाखान पॅलेस

आगा खान पॅलेस ही वास्तू म्हणजे पुण्यात आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षित करणारी वास्तू. वास्तुशास्त्रदृष्ट्या सुंदर शुभ्र पांढरी इमारत, आसपासची बागबगीच्यातून राखलेली हिरवळ आणि लाभलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली वास्तू. इ.स. १९४२ साली भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक मानाचं स्थान या वास्तूला लाभलंय.

१९ व्या शतकाच्या मध्यात पहिले आगाखान सुरतमार्गे भारतात आले. पश्चिम आशियातील उदार व्यापारी घराणं असा त्यांचा नावलौकिक होता. दुसरे आगाखान १८८५ साली मुंबईत वारले. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे)(जन्म-१८७७ व मृत्यू १९५७) यांनी इ.स. १८९२ मध्ये केली. ते शिया इस्मायली संप्रदायाचे ४८ वे इमाम होते. 'ऑल इंडिया मुस्लिम लिग' उभी करण्यात ज्यांचा हातभार होता, त्यांच्यापैकी ते एक होते. या संघटनेचे ते पहिले अध्यक्षही होते. ते इंग्रजांच्या काळात एक बडं प्रस्थ होते. १९३० सालच्या गोलमेज परिषदेला त्यांनी उपस्थिती लावली होती.

आगाखान पॅलेस

दुष्काळ पडला असताना ही वास्तू उभी राहिली होती. लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी हा महाल बांधला, असे कळते. जवळपास १००० जणांना रोजगार या वास्तूच्या उभारणीमुळे मिळाला. या महालाचे बांधकाम ५ वर्ष चालले व त्याकाळी १२ लाख रुपये खर्च आला. अनेक दालने असणाऱ्या या दुमजली पॅलेसचा विस्तार १९ एकर इतका आहे. ब्रिटिश व मुसलमानी वास्तुकलेची छाप या वास्तूवर दिसते. सुरवातीला 'येरवडा पॅलेस' म्हणून ही वास्तू ओळखली गेली. पण नंतर 'आगाखान पॅलेस' म्हणूनच या वास्तूचे नाव रूढ झाले. पुढे १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी हा महाल आणि परिसर भारत सरकारला दान केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या गांधीजींनी मुंबईत १९४२ च्या ऑगस्टमध्ये इंग्रजांना 'चले जाव' असा आदेश केला. त्यानंतर इंग्रजांनी ९ ऑगस्ट १९४२ ते ६ मे १९४४ दरम्यान महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तुरबा, स्वीय सचिव महादेवभाई देसाई, गांधीजींच्या शिष्या मीराबेन, डॉ. गिल्डर, सरोजिनी नायडू व इतर सहकाऱ्यांना पुण्यातील या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

कस्तुरबा गांधी ज्यांना 'बा' असे संबोधले जायचे त्यांनी २२ फेबुवारी १९४४ महाशिवरात्रीच्या दिवशी नजरकैदेत असताना येथे शेवटचा श्वास घेतला. त्याआधी महात्मा गांधींचे स्वीय सचिव महादेवभाई यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने १ ऑगस्ट १९४२ साली येथे निधन पावले होते. या दोघांची समाधीस्थळे येथे असून महात्मा गांधींच्या काही अस्थी येथे ठेवण्यात आल्या आहेत. ६ मे १९४४ या दिवशी महात्मा गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका येथून झाली.

कस्तुरबा गांधी व महादेव देसाई महात्मा गांधींसोबत

डावीकडील समाधी महादेव देसाई व उजवीकडील समाधी कस्तुरबा गांधी यांची

महालातील संग्रहालयात त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगांची निगडित चित्रे व छायाचित्रे यांचा समावेश आहे. चलेजाव चळवळ, सर्वधर्म समभाव यांसारखी अनेक चित्रे तसेच पर्णकुटी, सेवाग्राम यांसारख्या स्मारकांची छायाचित्रे बघायला मिळते. महात्मा गांधींची विविध व्यक्तींबरोबर छायाचित्रे बघायला मिळतात. आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधींच्या आयुष्यातील घडलेल्या घडामोडी एका फलकातून कळतात. संग्रहालयात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी यांचे पुतळे येथे बघायला मिळतात. येथे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बघायला मिळतो.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या दैनंदिन वापरातील काही वास्तू येथे प्रदर्शित केल्या आहेत. यात कपडे, भांडी, माळ, पादत्राणे यांचा समावेश आहे. या वस्तू महात्मा गांधींच्या नातसून आभाबेन गांधी यांनी इ.स. १९८८ मध्ये भेट दिल्या. कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी या दोघांनी वापरलेल्या वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

२००३ साली आगाखान पॅलेस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. गांधी राष्ट्रीय स्मारकातर्फे येथे वर्षभर वास्तूशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महात्मा गांधींची खोलीसुद्धा इथे पाहायला मिळते. महात्मा गांधींची यावर्षी १५०वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने ती खोली मध्यंतरी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. तसेच वास्तूचा दुसरा मजला देखील आता बघण्यासाठी खुला झाला आहे, असे मध्यंतरी वृत्तपत्र वाचनात आले.

संग्रहालयातील चित्रे-छायाचित्रे व वस्तू
वास्तूतील एक बंदिस्त खोली

सुरेख वास्तू आगाखान पॅलेस

-------------------------------------------------------------------------------
पत्ता - पुणे नगर रस्ता, पुणे ४११०१४
तिकीट - सशुल्क
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ :
१) पुणे शहर दर्शन - डॉ. शां. ग. महाजन 
२) असे होते पुणे - म. श्री. दीक्षित
-------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp