पुणेरी हॉटेल - पूना गेस्ट हाऊस

पुणे जसे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे तशी येथील खाद्यसंस्कृती देखील जगप्रसिद्ध आहे. भारतातल्या विविध प्रांतातलेच नाही तर देशोदेशीचे उत्तम खाद्यपदार्थ पुण्यात सध्या मिळायला लागले आहेत. इथली अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक चव तर खवय्यांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असते. त्यामध्ये बराच वरचा नंबर लागेल तो 'पूना गेस्ट हाऊस' सुप्रसिद्ध हॉटेलचा. या उपहारगृहाची अजून खासियत म्हणजे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील कलाकारांचा या वास्तूशी संबंध आला. अशा या 'पुणेरी' पूना गेस्ट बद्दल आज आपण जाणून घेऊयात.


पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता (Image source - Google)

बुधवार पेठेत असलेले हे 'पूना गेस्ट हाऊस' लक्ष्मी रस्त्यावर आहे. बेलबाग चौकाकडून गणपती चौकाकडे आपण जाऊ लागलो की मध्यात उजवीकडे दिसते पूना गेस्ट हाऊस. येथील एका जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर हे उपहारगृह आहे. मूळचे कोकणातील नरहर दामोदर तथा नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ साली पूना गेस्ट हाऊसची स्थापना केली. तत्पूर्वी नानासाहेब सरपोतदार स्वतः मूकपट, नाटकांची निर्मिती करीत असत. त्यांचा एक स्टुडिओ देखील होता. परंतु नाटक चित्रपटांना जसा मंदीचा काळ आला तसे ते हॉटेल व्यवसायाकडे वळले. पूना गेस्ट हाऊस सुरु झाले तेव्हा इथले विशेष आकर्षण होते ते 'बाजीराव चिवडा' व 'मस्तानी मिसळ' या पदार्थांचे.

निवासाची सोय येथे असल्याने पूर्वी कलाकार पुण्यात आले की येथे रहात असत. बालगंधर्वांपासुन ते देवानंदांपर्यंत अशी दिग्गज मंडळी येथे राहून गेली आहेत. जुन्या काळात त्यांच्यासाठी हे जणू हक्काचं स्थान. फक्त कलावंतचं नव्हे तर इतर क्षेत्रातील मंडळींना आश्रय या वास्तूने दिला आहे. फिरती चित्रपटगृहे म्हणजेच 'टूरिंग टॉकीज'ची मंडळी पुण्यात आल्यावर निश्चितपणे येथे येत असत. आचार्य अत्रे यांनी पण एकदा येथे दुपारचे भोजन केले होते. विविध क्षेत्रातील नामवंतांना अखेरच्या काळात आधार दिला तो याच पूना गेस्ट हाऊसने. १९५२-५३ मध्ये राजधानी दिल्लीत पूना गेस्ट हाऊसची शाखा काढली गेली. काही वर्षे ती चांगली चालली. तसेच माथेरानलाही एक शाखा होती.


थाळी (Image source - Zomato)

१९६१च्या पानशेत पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र पूना गेस्ट हाऊसने सुरु केले होते. त्या काळरात्री पिठलं भाताचे जेवण देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. अशा ऐतिहासिक पूना गेस्ट हाऊसच्या सरपोतदारांची तिसरी पिढी सध्या उपहारगृह सांभाळत आहे. आउटडोअर केटरिंग सर्व्हिसही येथे उपलब्ध आहे. सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे होतात. पिठलं भाकरी, भरली वांगी, बिरडयाची उसळ, मसाले भात, कोथिंबीर वडी, 4आमरस, उकडीचे मोदक असे अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर पूना गेस्ट हाऊसला पर्याय नाही. थाळीसह येथे दडपे पोहे, थालीपीठ व मिसळ हे पदार्थही आवडीने खाल्ले जातात.


दडपे पोहे व थालीपीठ (Image source - Zomato)
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) असे होते पुणे - म. श्री. दीक्षित
२) पुण्यसंस्कृती भाग २ - वि. वा. भिडे
-------------------------------------------------------------------------------

Comments