छत्रपती शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

महापुरुषांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून पुतळे उभारण्यात येतात. पुणे शहर जसे अनेक गोष्टींकरिता प्रसिद्ध आहे तसे ते पुतळ्यांसाठी सुद्धा ओळखले जाऊ शकते. इतक्या मोठ्या संख्येने पुतळे पुण्यात पहायला मिळतात. त्यात आजच्या घडीला शिवाजी महाराजांचे पुण्यात अनेक पुतळे दिसतात. पण यातील सर्वात महत्वाचा पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा. तो पुतळा आहे शिवाजीनगरमधील SSPMS म्हणजेच 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल'च्या आवारात. चला तर मग आज आपण या पुतळ्याविषयी जाणून घेऊयात. 

पुण्यात शिवाजी महाराजांचे पुतळ्याच्या रूपात स्मारक उभे रहावे, यासाठी काही प्रतिष्ठित व संस्थानिकांनी व्यक्तींनी पुढाकार घेतला. त्यात कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज अग्रणी होते. तेव्हाच्या भांबुर्ड्यात (आत्ताचे शिवाजीनगर ) साडेसात एकरच्या आसपास १ लाख रुपयास जमीन खरेदी केली गेली. त्यानंतर वर्षभरातच १९ नोव्हेंबर १९१९ मध्ये महाराजांच्या पुतळ्याची कोनशिला प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते बसविण्यात आली. शाहू महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज यांनी पुतळा उभारण्याचा निश्चय केला. पुतळा उभारण्याचे जबाबदारी प्रथम शिल्पकार रावबहाद्दर म्हात्रे यांच्यावर सोपविली होती. परंतु या कामास विलंब होत असल्याने शिल्पकार विनायक पांडुरंग उर्फ नानासाहेब करमरकर यांच्यावर सोपविण्यात आली. करमरकर यांना या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम दिले असता त्यांनी ते खूप लवकर पूर्ण केले होते.


शिवपुतळा

करमरकर यांनी आधी छोटे साडेतीन फुटांचे मातीचे मॉडेल बनविले. त्यासाठी राजाराम महाराजांचा पदरीचा अरबी घोडा वापरल्याचे कळते. या मॉडेलवर पहिला प्रयोग केला गेला. तो यशस्वी झाल्यावर साडे तेरा फुटांच्या पुतळ्याचे काम सुरु झाले. एवढ्या मोठ्या ब्रॉन्झ (कांस्य) धातूच्या पुतळ्याचे अवाढव्य काम करणे नक्कीच सोपे नसणार. प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्रॉन्झचा ८ टन रस ओतण्याचे काम करण्यास मुंबईतील कंपन्या तयार झाल्या नाहीत. शेवटी माझगाव डॉक येथे हा शिल्पकारांच्या जबाबदारीवर पुतळा तयार करण्याचे ठरले. सर्व प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आणि हे मोठे अवघड काम मनासारखे झाले. शिवाजी महाराजांचा जयजयकार तेथूनच सुरु झाला होता. मुंबईहून पुण्यास हा पुतळा आणणे हे अजून एक आव्हानच होते. रेल्वेच्या विशेष मदतीने हा पुतळा काळजीपूर्वक १० जून १९२८ रोजी पुतळा पुण्यास आला. स्वप्न साकार झाले आणि शिवपुतळा तयार झाला होता.

दिनांक १६ जून १९२८ रोजी पुतळ्याचे उदघाटन मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात हा अपूर्व सोहळा पार पडला. त्यावेळेस सर लेस्ली विल्सन यांनी शिवाजी महाराजांच्या थोरवीचे अनेक उद्गार काढले. अवघ्या देशाची शान असणारा हा पुतळा गेली ९१ वर्षे मोठ्या दिमाखात उभा आहे. पुतळ्याचे वजन ११ टन असून खर्च २ लाख २७ हजार रुपये आला. या पुतळ्याबाबत 'एका स्मारकाची जन्मकथा' अशी शिल्पकार करमरकर यांची छोटी पुस्तिका असल्याचे समजते. शिवपुतळ्याभोवतीचा परिसर बाग फुलवून चांगला राखला आहे. संस्थेच्या बाहेरून रस्त्यावरून हा पुतळा दिसतो. जवळून हा पुतळा पाहता येत नाही, त्यासाठी परवानगी काढावी लागते. शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्रातील पहिला अश्वारूढ पुतळा बहुदा देशातील पण पहिलाच असावा. या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचा एक छोटा ब्लॅक अँड व्हाइट विडिओ यु-ट्यूब वर पाहायला मिळतो. त्यात गव्हर्नर व त्यांच्या पत्नी हत्तीवरून आलेल्या दिसतात.


चबुतऱ्यावरील शिल्पे

पुतळ्याच्या चबुतऱ्यावर भवानी देवीचा, राज्याभिषेकाचा, वणी दिंडोरीच्या लढाईचा व कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा असे एकूण चार प्रसंग कोरलेले आहेत. त्याखाली प्रसंगांची माहिती देखील पहावयास मिळते. AISSMS म्हणजेच 'ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी'ची 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल' (SSPMS) ही शाळा १९३२ सालापासून आहे. पुतळ्याच्या मागील बाजूस तिची इमारत दिसते. येथील चौकासही 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक' असे नाव दिले आहे. तर कॉर्पोरेशनच्या पुलासही 'छत्रपती शिवाजी पूल' (नवा पूल) असे नाव आहे. येथूनच 'छत्रपती शिवाजी महाराज रस्ता' सुरु होऊन तो स्वारगेट पर्यंत जातो. त्यानंतर पुण्यात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे पुण्यात उभे राहिले. तरी या युगपुरुषाचा हा पहिला पुतळा विशेष असून पहायची संधी मिळाल्यास जरूर पहा.

शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) असे होते पुणे - म. श्री. दीक्षित
२) पुणे शहराचा ज्ञानकोश - डॉ. शां. ग. महाजन
३) सफर ऐतिहासिक पुण्याची - संभाजी भोसले
४) मुठेकाठचे पुणे - प्र. के. घाणेकर
५) sspms.in
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

---------------------------------------------------------------------------------

6 comments:

INSTAGRAM FEED

@suprasadp