जोशी रेल्वे संग्रहालय

पुण्याने ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबर तंत्रज्ञानात देखील आपला पाय रोवला आहे. त्याची साक्ष पुण्यातल्या कोथरूडमधील करिष्मा सोसायटीजवळ असणाऱ्या 'जोशीज म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वे' म्हणजेच 'जोशी रेल्वे संग्रहालय' मध्ये मिळते. देशातील असं हे एकमेव छोट्या धावत्या रेल्वेचे संग्रहालय आहे. येथे रेल्वेसह साऱ्या शहराचीच प्रतिकृती उभारली आहे. तुम्ही पुणेकर असाल किंवा पुण्यात आलात तर आवर्जून बघण्याजोगे हे संग्रहालय आहे. फक्त हातात वेळ राखून ही संग्रहालये डोळसपणे पाहिली गेली पाहिजेत.

बाळकृष्ण शंकर जोशी उर्फ भाऊसाहेब जोशी यांना लहानपणापासून विज्ञानाची आणि त्यातही खास करून रेल्वेची आवड होती. परदेशात रेल्वेगाड्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शनं पाहिल्यावर आपल्या देशातही लहान मुलांसाठी असे रेल्वेचे प्रदर्शन असावे, अशी कल्पना त्यांना सुचली. आपला छंद जपत त्यांनी रेल्वेचा संग्रह करण्यास सुरवात केली. तेव्हापासून सुरु झालेला हा ४० वर्षांचा प्रवास संग्रहालयात रूपांतरित झाला. १ एप्रिल १९९८ साली सुरु झालेले संग्रहालयाची सुरवात करण्यासाठी ७ वर्षांचा कालावधी लागला. दुर्दैवाने ११ ऑक्टोबर १९९८ ला भाऊसाहेब जोशी यांचे निधन झाले. त्यानंतर संग्रहालयाची व्यवस्था आता त्यांचे चिरंजीव रवी जोशी व त्यांची मुले बघत आहेत. डॉ. रवी जोशी यांनी या प्रदर्शनात काही नवीन गोष्टींची भर घातली.


जोशी रेल्वे संग्रहालय   Image Source - Google 

शहराची प्रतिकृती   Image Source - Google 

संग्रहालयाचा सेटअप पहिल्या मजल्यावर एका खोलीत गोलाकार आकाराचा आहे. खोलीत अंधार करून येथे सुमारे २५ मिनिटे द्रुकश्राव्य सादरीकरण होते. संग्रहालयातील हा शो सुरु झाला की आपण वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. शोसाठी इंग्लिश मध्ये भाष्य करणारी ऑडिओ क्लिप लावली जाते. वेगवेगळ्या जवळपास १० प्रकारच्या रेल्वे इथे बघायला मिळतात. त्यात वाफेवर चालणारी रेल्वे, डिझेल इंजिनची रेल्वे, बुलेट ट्रेन, जलदगती एक्सप्रेस, रोप रेल्वे, भुयारी रेल्वे अशा अनेक प्रकारच्या रेल्वे इथे धावताना पहायला मिळतात. या संग्रहालयात वापरण्यात आलेल्या काही रेल्वे मॉडेल्सची किंमत चाळीस ते पन्नास हजार रुपये इतकी आहे.

भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. त्या रात्रीचे आकाश येथे पाहायला मिळते. तेव्हाच्या वेगवेगळ्या ताऱ्यांचे स्थान संगणकाद्वारे माहिती मिळवून येथे त्यांची प्रतिकृती केली आहे. इथे रेल्वेसह सोबतच्या शहरात पवनचक्की, जलतरण तलाव व त्यात पोहणारी माणसे, इमारती, रस्ते, चारचाकी धावत्या गाड्या, बोगदे, क्रेन, कारखाने यांचा समावेश बघायला मिळतो. इथे जवळपास ५०० मीटर वायरचे जाळे कार्यरत आहे. एकूण ६ प्लॅटफॉर्म्स, २६ पॉईंट्स व ६५ सिग्नल्स आहे. उत्तम प्रकाश योजनेसह पावसाच्या हलक्या सरींचा देखील इथे आपल्याला सुखद अनुभव मिळतो.


संग्रहालयातील रेल्वे


रेल्वे प्लॅटफॉर्म

सन २००४ मध्ये 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्' ने या संग्रहालयाची नोंद घेतली. कोथरूड मधील 'जोशी रेल्वे संग्रहालय ते कोथरूड इंडस्ट्रिअल इस्टेट' या रस्त्याला बाळकृष्ण शंकर जोशी उर्फ भाऊसाहेब जोशी यांचे नाव देण्यात आले आहे. संग्रहालयातर्फे लहान मुलांसाठी रेल्वेचे प्रतिकृती तयार करण्याचे छंदवर्ग घेतले जात असल्याचे तसेच लहान रेल्वे मॉडेल्सचे उत्पादन सुरु केले असल्याचे समजते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना येथील धावत्या रेल्वेच्या प्रतिकृती खिळवून ठेवतात. शहरातली ही मामाच्या गावाला नेणारी 'झुक झुक झुक झुक आगीन गाडी'ची काल्पनिक सफर एकदा जरूर करा. 

संग्रहालयातील धावती रेल्वे
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) पुणे शहरातील सामाजिक शास्त्रे विषयक वस्तुसंगहालये - डॉ. शां. ग. महाजन
२) www.minirailways.com 
-------------------------------------------------------------------------------
वेळ - सोमवार-शुक्रवार - ९.३० ते ५ , शनिवार- ९.३० ते ४  ५ ते ८, रविवार - ५ ते ८
पत्ता - १७/१ बी/२ , जी. ए. कुलकर्णी पथ, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र  ४११०३८
फोन नंबर - ०२० २५४३५३७८ , ०२० २५४५४४७४
तिकीट - ९० रुपये ( संग्रहालय पाहण्यासाठी किमान चार प्रेक्षक हवे अशी अट आहे. )
वेबसाईट – www.minirailways.com
-------------------------------------------------------------------------------

Comments