मराठा इतिहास संग्रहालय

शिवछत्रपतींच्या रूपाने सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यात पेटलेली हिंदवी स्वराज्याची स्वातंत्र्यमशाल पुढे पेशव्यांनी अटकेपार पोहोचवली. इ.स. १६७४ ते इ.स. १८१८ कालखंडातील मराठा साम्राज्याने इथल्या भूमीला परकीय, आक्रमक सत्तांपासून सुटका करून दिली. असा हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास साऱ्या देशाचा प्रेरणास्रोत आहे.  त्या मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय पुण्यात आहे.

पुण्यात येरवड्याजवळ असलेल्या डेक्कन महाविद्यालयात 'मराठा इतिहास संग्रहालय' आहे. १९२५ ते १९३९ सालापर्यंत हे संग्रहालय साताऱ्यात होते. त्यानंतर ते डेक्कन महाविद्यालयात स्थलांतरित झालेइतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी ठिकठिकाणहून जमा केलेला संग्रह येथे पाहायला मिळतो. शिवाय अनेक दफ्तरांतून मिळविलेला ऐतिहासिक ठेवा येथे आहे. जमखिंडी संस्थानचे अधिपती विनायकराव पटवर्धन यांनी त्यांच्याजवळील ऐतिहासिक संग्रह येथील संग्रहालयाला देऊ केला. या संग्रहालयात मराठा इतिहासासंबंधी १८ व १९ व्या शतकातील महत्वपूर्ण अस्सल कागदपत्रे आहेत.

संग्रहालयाजवळ विविध संस्थानांतील मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. यात विजापूरच्या आदिलशहाची फर्माने, छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई, थोरले बाजीराव, चिमाजीअप्पा, नाना फडणवीस, महादजी शिंदे, माधवराव पेशवे, सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्याखेरीज अनेकांची पत्रे संग्रहालयात बघायला मिळतात. या पत्रांबद्दलची थोडक्यात माहिती येथे लावण्यात आली आहे. शिवशाहीचे विश्वसनीय साधन म्हणून मानली जाणारी सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजी महाराजांच्या जीवनावर बखर लिहून काढली. ती बखर येथे पाहायला मिळते. सभासद बखरीशिवाय फलटणच्या निंबाळकर घराण्याची बखर, सातारकर भोसल्यांच्या घराण्याची बखर, भोसले घराण्याचे कुलोपाध्याय पंडितराव घराण्याची बखर पहायला मिळतात. शिवाय १८ व्या शतकातील संस्कृत गीता, ताडपत्रांवरील ग्रंथ, मीमांसा ग्रंथ, युसूफ-जुलेखा हस्तलिखित इत्यादींचा समावेश होतो.

सुमारे ४००००च्या आसपास मोडी कागदपत्रे, ४००० वेगवेगळ्या राजसत्तांची विविध नाणी, विविध भाषांतील २०० हस्तलिखिते, ४० दुर्मिळ ग्रंथ इतका मोठा संग्रह येथे आहे. त्यातील निवडक संग्रह येथे पहायला मिळतो. इंग्लिश, मराठी, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, फारसी, लॅटिन भाषेतील ग्रंथांचा समावेश येथे आहे. हस्तलिखिते मराठी, संस्कृत, अरेबिक, फारसी आणि इंग्रजी या भाषांमध्ये संग्रहालयाकडे उपलब्ध आहेत. येथील मराठा सरदारांच्या मुलांची मराठा शैलीतील लघुचित्रे बघण्यासारखी आहेत. इंग्रजांच्या सैन्यातील हिंदुस्थानी शिपाई व इंग्रज अधिकाऱ्यांची चित्रे पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांची चित्रे सुद्धा पहायला मिळतात. संग्रहालयात ३ ताम्रपट पहायला मिळतात. कदंब राजा रविवर्मन, राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग व चालुक्यराजा विजयादित्य यांचे ताम्रपट संग्रहालयात आहेत. मराठेशाहीतील वेगवेगळ्या पगड्यांचे नमुने बघायला मिळतात. इ.स.१७७९ मधील तळेगावच्या मराठा-इंग्रज लढाईचा नकाशा येथे पहायला मिळतो.

संग्रहालयातील जमखिंडी संथानच्या स्वतंत्र दालनात १८ व १९ व्या शतकातील एक हजारपेक्षा जास्त शोभिवंत वस्तू असून शंभरहून अधिक जास्त शस्त्रे आहे. जमखिंडी संस्थानच्या दालनात हस्तिदंत, चिनीमाती, कांस्य, काच, तांबे इत्यादींपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू पहायला मिळतात. हस्तिदंतापासून बनविलेल्या सुंदर नक्षीकाम केलेल्या वस्तू बघायला मिळतात. चंदनापासून बनविलेल्या देवदेवतांच्या मूर्तींसह मनमोहक संगमरवरी शिल्पे येथे आहेत. इथे भारतीय बनावटीची शस्त्रे व युरोपियन शस्त्रेही आहेतअठराव्या व एकोणिसाव्या शतकातील शस्त्रांमध्ये तलवारी, भाले, बंदुका, खंजिरे प्रदर्शित केले आहेत. चिलखत व शिरस्राणदेखील इथे बघायला मिळते . इतिहासप्रेमींनी जरूर पहावे असे हे संग्रहालय नक्कीच आहे.
-------------------------------------------------------------------------------
वेळ – १०.३० ते ३
पत्ता - डेक्कन महाविद्यालय, येरवडा, पुणे ४११००६
फोन नंबर - ०२० २६५१३२२६
तिकीट - ३० रुपये
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) पुणे शहराचा ज्ञानकोश - डॉ. शां. ग. महाजन
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c

---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp