पुण्यातल्या 'चहा'विषयी थोडेसे...

चहाचा इतिहास आपल्याला काही हजार वर्षे मागे नेतो. असं म्हणतात की चीनमध्ये चहाचा शोध लागला. तेथील शेन नंग नावाचा राजासमोर गरम पाण्याचा ग्लास ठेवला होता. त्यात चुकून चहाची सुकलेली पाने पडली आणि चहाचा रंग बदलला. राजाने ते पेय प्यायले, त्याला बरे वाटले आणि आवडले सुद्धा. तेव्हापासून चहा पिणे सुरु झाले. सुरवातीला चहा हे पेय 'औषधी पेय' म्हणून ओळखले जात असत. भारतात चहा इंग्रजांनी आणला. सुरवातीला चहाचे फॅड आपल्याकडे नव्हते. पण नंतर भारतात चहा खूप लोकप्रिय झाला. आज चहाला भारतात प्रचंड मागणी असून हा देश आता चहाच्या प्रमुख उत्पादकांपैकी आहे. पाण्यानंतर सर्वाधिक चहा प्यायला जातो. पुण्यात चहाप्रेमींची काही कमी नाही. इथे चहा अमृतासमान समजला गेला आणि चहास नाव मिळाले ''अमृततुल्य''. आज आपण पुण्यातल्या चहाविषयी जाणून घेऊ.

कारण काहीही असो निमित्य मात्र चहा ठरतो. तो तर असाही चहाची तलफ मिटविण्यासाठी घेतला जातो. "आद्य अमृततुल्य" हे पुण्यातलं पहिलं अमृततुल्य. विश्वनाथ नर्तेकर यांनी १९२४ साली हे अमृततुल्य सुरु केलं. सध्या ते रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकाच्या अलीकडे आहे. ते मूळचे राजस्थानातले. त्यांची चौथी पिढी या व्यवसायात असल्याचे कळते. सुरवातीला या अमृततुल्यात चहा एक पैशाला मिळायचा. चहाबरोबर भजी, बर्फी, जिलबी यापैकी एक काहीतरी मिळायचे. राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील मंडळींनी मध्यवर्ती पुण्यात येऊन चहाची अमृततुल्य सुरु केली आणि आपलं बस्तान बसवलं. त्यांनी दुकानांना नावे दिली वैजनाथ, नागनाथ, नर्मदेश्वर, अमृतेश्वर, माणकेश्वर. इतर नावे दिलेली सुद्धा आढळतात. अशी अमृततुल्य आता पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी आजही ती बघायला मिळतात.


तिथली रचना, मांडणी एकूणच स्वरूप सारखेच असते. बहुतांशी ठिकाणी मालकच चहा बनवून अमृततुल्य चालवायचे. चहा बनवायची पद्धत सर्वत्र सारखीच असायची फरक मात्र चवीत असायचा. आजही ती तशीच पाहायला मिळते. अमृततुल्यमधील चहा बनविण्याची पद्धत बघण्यासारखी असते. चहाबरोबर येथे दूध, कॉफी, सामोसा, पोहे, ताक, लस्सी असे पदार्थ पाहायला मिळतात. तसे पाहिले तर परप्रांतीय लोकांबरोबर मराठी मंडळींची अमृततुल्य पूर्वीपासून आहेत.

पुणे आणि चहाचे नातं अतूट आहे. अमृततुल्य संस्कृती येथे नांदत होतीच. चहाचा व्यवसाय बिनभांडवलीचा, सोपा आणि जास्त नफा मिळवून देणारा आहे. आजमितीस शहरातल्या सर्व भागात चहाच्या टपऱ्या, दुकाने आहेतच. पण पुण्यात आता चहा ब्रँड झालाय. मोठमोठाल्या दुकानाच्या पाट्या, युनिक टॅगलाईन, पुणेरी पाट्यांचे फलक, चहाचे फायदे, आमचा इथपर्यंतचा प्रवास, आमची वैशिष्ट्ये अशा गोष्टी प्रसिद्धीकरिता वापरल्या जात आहेत. त्यांनी चहाचा चेहरा मोहरा बदलला. 'येवले अमृततुल्य', 'साईबा अमृततुल्य', 'प्रेमाचा चहा', 'कडक स्पेशल' हे त्यातले काही ब्रँड. त्यातल्या काहींनी २०, ५०, १०० शाखा उघडल्या आहेत. शिवाय 'चाय कट्टा', 'चाय एक्सप्रेस', 'चाय पॉईंट', 'चाय टपरी', 'चाय-ला' यांची बदलत्या जमान्याबरोबर बदलत चाललेल्या चहाला समोर ठेऊन निघालेली आउटलेट सुद्धा पुण्यात पहायला मिळतात.

Source - Google तंदूर चहा, बासुंदी चहा, मटका चहा, गुलकंद चहा, गवती चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, आईस टी, कश्मिरी कावा असे अनेक प्रकार आज बघायला मिळतात. तरुणाईबरोबर ज्येष्ठांचेही कट्टे चहाभोवती जमलेले दिसतात. तिथे दोन स्पेशल, एक कमी साखरेचा, चार कटिंग असे हमखास ऐकायला मिळते. आता चहा बहुतांशी ठिकाणी काचेच्या ग्लासात किंवा कपात मिळतो. काही ठिकाणी कपबशीत आजही मिळतो. 

इराणी चहा हा देखील पुण्यात मिळतो. इराणी लोकं पहिल्या महायुद्धकाळात भारतात आली. त्याच्या आधीही ती आली होतीच. त्यांनी ब्रिटिश लष्करी छावण्यांच्या आसपास त्यांनी चहा, ब्रेड, बटर, खारी अशा पदार्थांची विक्री करणारी दुकाने सुरु केली. पुण्यातही इराण्यांची अनेक हॉटेल्स होती आणि अजूनही काही बघायला मिळतात. त्यात "कॅफे गुडलक", "कॅफे पॅराडाईज" ही डेक्कन परिसरातील सर्वांना ज्ञात आहेतच. पैकी कॅफे गुडलक १९३५ सालापासून उभे आहे. शिवाय लकडी पुलनजीकचे "रिगल", लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ व सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातले हॉटेल येथे आजही इराणी हॉटेल टिकून असल्याचे कळते. हॉटेलचे इंटिरियर, इथला माहोल एकूणच निराळा असतो. वेळ घालविता येत असल्याने एकटेदुकटे, कामानिमित्त आलेली लोकं, तरुणाईचे गप्पांचे अड्डे येथेही तासनतास पाहायला मिळतात.
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१) पुण्यभूषण दिवाळी अंक - २०१२ व २०१५
-------------------------------------------------------------------------------
© २०१९ सुप्रसाद पुराणिक

Source - Google 

4 comments:

INSTAGRAM FEED

@suprasadp