पुण्यातले पहिले चित्रपटगृह - आर्यन टॉकीज

'महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी', 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट', 'दख्खनची राणी' म्हणून पुणे शहर ओळखले जाते. 'पेंशनर्सचे शहर', 'सायकलींचे शहर' म्हणूनही पुण्याची ओळख होती. त्याबरोबर पुणे हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या उद्योगाचे महत्वाचे स्थान देखील होते. आजही पुण्यातल्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (FTII) आणि 'नॅशनल फिल्म अर्काइव्हस ऑफ इंडिया' (NFAI) या देशासाठी भूषणास्पद ठरलेल्या संस्था पुण्यात कार्यरत आहेत. पैकी 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेच्या जागेवर पूर्वी प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ होता. दूरदर्शन आता घराघरात पोचला असला तरी अजूनही सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे वेड कमी झालेले नाही. एकाच ठिकाणी निरनिराळ्या पडद्यांवर वेगवेगळे चित्रपट पाहण्याची सोय म्हणजेच मल्टिप्लेक्सची सुरवात पण महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यातच झाली. मल्टिप्लेक्सच्या जमान्यात आपण आज पुण्यातल्या पहिल्या चित्रपटगृहाची माहिती घेऊयात.

NFAI & FTII संस्था (Image Source - Google)

मराठी नाट्यसृष्टीच्या ऐन बहराच्या काळात दादासाहेब फाळके चित्रपटाचे नवे माध्यम नव्या तंत्रज्ञानासह मनोरंजन क्षेत्रात उतरले. त्यांनी आपला पहिला ''राजा हरिश्चंद्र'' सिनेमा मुंबईत कोरोनेशन चित्रपटगृहात पहिल्यांदा दाखविला. तेव्हापासून चित्रपट निर्मिती व चित्रपटगृहांची उभारणी सुरु झाली. त्यात पुण्यात सर्वप्रथम उभे राहिले 'आर्यन चित्रपटगृह'. आत्ता जिथे मंडईत टिळक पुतळ्यासमोर हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ आहे, त्या जागेवर आर्यन चित्रपटगृह ७ फेब्रुवारी १९१५ मध्ये बांधले गेले होते. ते गंगाधर नरहर उर्फ बापूसाहेब पाठक यांनी उभारले होते. मनोरंजनाच्या या नव्या साधनास पुणेकर रसिकांनी पुढची अनेक वर्षे उदंड प्रतिसाद दिला. 

बुधवार पेठेचा परिसर पुण्यासाठी अनेक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण होता. म्हणूनच गजबजलेल्या या परिसराची निवड चित्रपटगृहासाठी केली गेली असावी. उत्तम आसन व्यवस्था, ३५ मि.मि. पडदा, दोनही बाजूंना भव्य कमानींचे दरवाजे, स्वतंत्र प्रोजेक्टरची खोली अशा सुविधांनी या सिनेमागृहाची इमारत मंडईसमोर दिमाखात होती. मागील बाजूस बसण्यासाठी वेगळी आसनव्यवस्था असे. सुरवातीला लोकांनी चित्रपट पहावे म्हणून चालत्या हातगाडीवर कोंबड्याच्या आवाजाने जाहिरात करणे, पडद्यासमोर वाद्यवृंद वाजविणे, नारळाच्या करवंटीतून घोड्यांच्या टापांचे आवाज काढणे, मडक्याला हरणाचे कातडे लावून वाघाच्या डरकाळीचे आवाज काढणे असे प्रयोग केले गेले.

इ.स.१९३१ मध्ये भारतातला पहिला बोलपट ''आलम आरा'' हा देशात सर्वप्रथम आर्यनमधे प्रदर्शित झाला. तसेच इ.स.१९३६ मधील ''संत तुकाराम'' हा चित्रपटही येथे झळकला होता. अनेक उत्तमोत्तम हिंदी व मराठी चित्रपट येथे गाजले. थिएटरच्या ६७ वर्षांच्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांनी येथे रौप्य-हीरक-सुवर्ण-शताब्दी महोत्सव साजरे केले. आर्यनमध्ये लोकमान्य टिळकांनी बाबुराव पेंटर यांचा 'सैरंध्री' चित्रपट पहिला होता असे समजते. कालांतराने वाढत्या वस्तीबरोबर पुण्यात नवनवे थिएटर्स निर्माण झाले. याच परिसरात अनेक चित्रपटगृहे उभी राहिली. तेव्हा चित्रपट पाहण्यासाठी सुरवातीला दर दोन आणे, चार आणे असे आण्यांमध्ये असे. रिक्षा येण्यापूर्वी आर्यन सिनेमासमोर टांगे व भेळेच्या गाड्या असे चित्र दिसत असे.

''आलम आरा''चे पोस्टर (Image Source - Google)

पुणे महापालिकेशी या थिएटरच्या जागेशी करार होता. तो संपुष्टात आल्यावर इ.स. १९८२ मध्ये आर्यनचा ताबा महानगरपालिकेने घेतला. त्यावेळी या विषयावर उलटसुलट चर्चा झाल्या. परंतु कालांतराने इ.स. १९८३ यावर्षी ही ऐतिहासिक वास्तू पाडण्यात आली. तिथे मोठे वाहनतळ उभारण्यात आले. आपल्याला आपला वारसा जतन करता येत नाही, हेच यावरून सिद्ध होते. आर्यन चित्रपटगृहाचा शताब्दी महोत्सव पुण्यातील 'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय' (NFAI) या संस्थेत साजरा झाल्याचे कळते. आर्यन चित्रपटगृहातील एक जुनी खुर्ची भारत इतिहास संशोधन मंडळातील संग्रहालयात जपून ठेवली आहे. तिथे बापूसाहेब पाठक यांचे चित्र देखील पहायला मिळते. तसेच त्या टॉकीजचे नाव बाबुगेनु वाहनतळाच्या सध्याच्या फलकात बघायला मिळते. एवढ्याच काय त्या पहिल्या चित्रपटगृहाच्या अस्तित्वाच्या खुणा. बाजूला महापालिकेने या चित्रपटगृहाचा सविस्तर माहितीचा फलक लावला तर चांगलेच होईल.

वाहनतळाच्या फलकात आर्यन टॉकीजचे नाव
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१) हरवलेले पुणे - डॉ. अविनाश सोवनी
२) पुणे शहराचा ज्ञानकोश - डॉ. शां. ग. महाजन
३) जुने पुणे आणि जुने वक्ते - दि. म. देशपांडे
४) आधीच पुणे गुलजार - वि. ना. नातू
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

---------------------------------------------------------------------------------

7 comments:

 1. आर्यनमध्ये "लोकमान्य टिळकांनी" बाबुराव पेंटर यांचा 'सैरंध्री' चित्रपट पहिला होता असे समजते. तो "रंगीत बोलपट" असलेला पहिलाच चित्रपट होता.
  हे पटत नाही. माहितीत काहीतरी घोळ आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. कृपया मला मग काही चुकलं असेल तर सांगा.

   Delete
  2. योग्य असेल तर माझ्या माहितीत बदल करेन.

   Delete
 2. Sairandhri हा अंशतः रंगीत चित्रपट होता . तो मूकप ट होता.पहिला मराठी बोलपट 1932 साली अयोध्येचा राजा होता

  ReplyDelete

INSTAGRAM FEED

@suprasadp