महर्षी कर्वे स्मारक

भारतरत्न धोंडो केशव कर्वे उर्फ ''महर्षी कर्वे'' (जन्म इ.स.१८५८ - मृत्यू इ.स.१९६२) म्हणजे स्त्री शिक्षण रुजवणारा थोर माणूस. त्यांना 'अण्णासाहेब कर्वे' म्हणून सुद्धा ओळखले जात असे. रुढीग्रस्त सामाजिक परिस्थितीत बालविधवांना आत्मनिर्भर बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. याशिवाय जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले. त्यांनी समाजाचा रोष पत्करून मोठ्या जिद्दीने मोलाचे कार्य करून ठेवले आहे. इ.स. १९५५ साली त्यांना ''पद्मविभूषण'' हा किताब, तर इ.स.१९५८ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ''भारतरत्न'' ने सन्मानित केलं गेलं. अशा या भारतमातेच्या सुपुत्राचे अपरिचित संग्रहालय व स्मारक पुण्यातील कर्वेनगर मधील 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या' आवारात आहे. त्यांनी इ.स. १८९६ साली त्या काळच्या हिंगणे बुद्रुक या गावात विधवा शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते. २००७ मधे 'महर्षी कर्वे' यांची १५०वी जयंती होती, तेव्हा या स्मारकाचे उदघाटन माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले होते.
संग्रहालय


रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णासाहेबांचे गाव. त्यांचे जन्मगाव, कुटुंब, शिक्षणासंबंधी माहिती सुरवातीला मिळते. इथे त्यांची मोडी लिपीची शुद्धलेखन वही, त्यांच्या हस्ताक्षरात संस्थेचा इतिहास व त्यांचे बॉंबे युनिव्हर्सिटीचे बी.ए. चे डिग्री सर्टिफिकेट पाहायला मिळते. अण्णासाहेब कर्वे हे वयाच्या १००व्या वर्षी भारताच्या सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नचे मानकरी ठरले. ते मानपत्र व पदक येथे बघायला मिळते. याशिवाय पदमविभूषण, स्वातंत्र्य समर शताब्दी समिती, केसर ए हिंद असे मिळालेले पुरस्कार इथे बघायला मिळतात. स्मारकातील संग्रहित वस्तूंमध्ये महर्षी कर्वे यांची पिशवी, पेन, घड्याळ, चष्मा, टोपी, कोट, छत्री, काठी या गोष्टी आहेत. अनेक तोफाकार करंडक सुद्धा नजरेस पडतात. शिक्षणासाठीच्या निधीकरिता ते भारताबाहेर गेले असतानाची माहिती वाचायला मिळते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची कागदपत्रं पाहायला मिळतात. महर्षी कर्वेंच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटना येथे माहितीफलक, अनेक वस्तू, छायाचित्रांसह पहायला मिळतात. महर्षी कर्वे आणि विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सोबतचे छायाचित्र इथे पाहायला मिळते.


अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सोबत महर्षी कर्वे

कर्वे यांना मिळालेले पुरस्कार

बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यांसारख्या घातक प्रथा, रूढीत अडकलेल्या विधवांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून अण्णांनी इ.स. १८९६ मध्ये 'अनाथ बालिकाश्रम' काढला. तसेच 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली. विधवांसाठी आश्रम आणि शाळा काढून त्यांनी या दोन्हींसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी 'निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून 'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि नंतर 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले. इथल्या संस्थेची सुरवात उजाड माळरानावर जेथे झाली, त्या मूळ झोपडीचे व शाळेतील पहिल्या विद्यार्थिनींचे छायाचित्र पहायला मिळते. ती दगडी कौलारू घरासारखी वास्तू अजूनही अस्तित्वात असल्याचे कळते. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि ७५० रुपये अण्णांकडे सुपूर्द केले होते. महर्षी कर्व्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून गणिताची पदवी संपादन केली होती. अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या कालखंडात गणित हा विषय शिकविला.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला होता. त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे इ.स. १८९१ मध्ये निधन झाले. त्यावेळेस अण्णांचे वय ४५च्या आसपास होते. त्याकाळात प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची प्रथा होती. मात्र पती गेल्यावर त्या लहान मुलीला मात्र त्यांची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. महर्षी कर्वे यांनी विधवापुनर्विवाहाची सुरवात स्वतःपासून केली. गोदूबाई या विधवा मुलीशी त्यांनी पुनर्विवाह केला. ही गोष्ट समाजाला पचनी पडली नाही, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. याच गोदूबाई पुढे 'आनंदी कर्वे' किंवा 'बाया कर्वे' म्हणून ख्यातनाम झाल्या.  त्यांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. 


पुनर्विवाहीत दांपत्ये


अण्णासाहेबांच्या वापरातल्या काही गोष्टी

इ.स. १९१६ साली सुरु झालेल्या पहिल्या महिला विद्यापीठाबद्दल कळते. अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. जपानकडून प्रेरणा घेऊन भारतातही महिलांसाठी विद्यापीठ हवे, असा विचार त्यांच्या मनात आला. ३ जून १९१६ या दिवशी पुणे येथे भारतातील पहिल्या स्वतंत्र महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ १५ लाख रुपयांची देणगी दिल्याने या विद्यापीठाचे नामकरण ''श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी'' (एस.एन.डी.टी.) करण्यात आले. आश्रमासाठी व विद्यापीठासाठी काहींचा विरोध होऊनसुद्धा त्यांनी अपार पायपीट करून पैसा उभा केला होता. 

९ नोव्हेंबर १९६२ रोजी महर्षी कर्वे यांचे हिंगण्यातील आश्रमात वृद्धापकाळानं निधन झाले. संग्रहालयाच्या शेजारील वास्तूत महर्षी कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह समाधी पहायला मिळते. शिवाय त्यांची पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे आणि पार्वतीबाई आठवले यांचीसुद्धा स्मारके पाहायला मिळतात. दुर्दम्य इच्छाशक्तीने समाजहित साधणारे महर्षी कर्वे यांचे संग्रहालय व स्मारक वेळ काढून नक्की बघा. त्यांनी मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये आत्मचरित्र लिहिली. त्यांचे १८ एप्रिल १९६८ रोजी भारत सरकारने जन्मशताब्दीनिमित्त पोस्टाचे तिकीट काढले होते. डेक्कन जिमखान्यापासून कोथरुडपर्यंतच्या रस्त्याला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्वे रस्ता व येथील वाढत्या वस्तीला कर्वेनगर असे नाव दिले गेले. कोथरुडमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बघायला मिळतो.

 संग्रहालयाच्या शेजारील वास्तूत पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे आणि विद्यार्थिनी पार्वतीबाई आठवले यांची स्मारके आणि महर्षी कर्वे समाधी ( पहिले छायाचित्रं - Source=Google )

हिंगण्यातील स्त्री शिक्षण सुरु झालेली मूळ जागा

-------------------------------------------------------------------------------
वेळ - १० ते ५
पत्ता - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वे नगर, हिंगणे बुद्रुक, पुणे- ४११०५२
फोन नंबर - ०२० २५३१३१३
वेबसाईट - maharshikarve.ac.in
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ - 
१) पुणे शहराचा ज्ञानकोश - डॉ. शां. ग. महाजन
२) https://maharshikarve.ac.in/about-us/heritage/
-------------------------------------------------------------------------------
© २०१९ सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp