सफर सायकल संग्रहालयाची

एके काळी पुणे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील आठवणींमध्ये सायकलचे एक वेगळे स्थान असते. १८ मे हा जागतिक संग्रहालय दिवस म्हणून साजरा होतो. याचे औचित्य साधून पुण्यात महापौरांच्या हस्ते २०१७ मध्ये एका संग्रहालयाचे उदघाटन झाले. तर या नवीन संग्रहालयाचे आकर्षण आहे सायकल. विक्रम पेंडसे यांनी सायकलींबरोबर गेल्या शतकातल्या समाजजीवनाचे चित्रच उभे केले आहे. हे संग्रहालय कर्वेनगर मधील सहवास सोसायटीत आहे.


सायकल संग्रहालय ( Source - Google )
ट्रायसिकल ( Source - Google )

विक्रम पेंडसे यांना लहानपणापासूनच सायकल व मोटारसायकलींचे अप्रूप होते. वाणिज्य शाखेकडील पदवीधर असलेले विक्रम पेंडसे १९९० पासून मोटारसायकल दुरुस्तीच्या व्यवसायात  होते. काही वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली ''बी.एस.ए. पॅराट्रूपर'' ( BSA PARATROOPER ) ही सायकल मिळाल्यानंतर सुरु झालेला हा प्रवास आज एका संग्रहालयात परावर्तित झालेला आहे.  गेल्या २५ वर्षात त्यांच्या संग्रहात साधारण २०० सायकल्स जमा आहेत. जीर्ण अवस्थेतील अनेक सायकल मूळ रूपात परत आणण्यास त्यांना साथ लाभली ती सायकलप्रेमी व सायकलपटू पांडुरंग गायकवाड यांची. त्यांच्या अथक प्रयत्नातून आजही प्रत्येक सायकल चालत्या अवस्थेत आहे.


दुमडणारी  सायकल ( Source - Google )

तीन मजली हे संग्रहालय विक्रम पेंडसे यांनी उभारले आहे त्यांच्या रहात्या घरातच. संग्रहालयाच्या बाहेर देखील काही सायकलचे नमुने पाहायला मिळतात. त्यामुळे सुरवातीलाच आपला उत्साह दुणावतो. लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, महिला व पुरुषांच्या सायकल, दुमडणारी सायकल अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सायकल बघायला मिळतात. सायकलींबरोबर येथे अनेक दुर्मिळ घरगुती वस्तू सुद्धा पाहायला मिळतात. 

येथील सर्वात जुनी सायकल इंग्लंडमध्ये बनविलेली ''सनबीम १९१४'' ही आहे. हॉर्न, दिवे असे विविध सायकलचे सुटे भाग सुद्धा येथे बघायला मिळतात. याशिवाय रॉकेलवर चालणारा पंखा, कुलुपे , घड्याळे , रेडिओ , ग्रामोफोन, रेकॉर्डप्लेयर, वेणीफणी पेट्या, टाइपरायटर, टेलिफोन, अडकित्ते, इस्त्र्या, डबे, शिवणयंत्रे, आरसे, कपाटं, वजन व मापे अशा कलात्मक अनेक घरगुती वस्तूंचे सादरीकरण येथे केले आहे. गॅस , रॉकेल व LPG गॅसवर चालणारी इस्त्री येथे पाहायला मिळते. लहान मुलांच्या पॅडल कार्स सुद्धा पाहायला मिळतात.

पॅडल कार्स व इतर वस्तुंचा संग्रह ( Source - Google )

तिसऱ्या मजल्यावर एका जुन्या सायकलच्या दुकानाची प्रतिकृती उभारली आहे. सायकल विषयीचा सेट-अप त्यात पाहायला मिळतो. अनेक ठिकाणहून जमविलेला हा सायकलसंग्रह पाहून थक्क व्हायला होते. येथील जुन्या पुण्याची छायाचित्रेही आपल्याला आकर्षित करतात. असे हे छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय आपल्याला सायकलच्या रम्य आठवणींची सफर घडवते.
शिवणयंत्र ( Source - Google )कारच्या आकाराचा पानाचा डबा ( Source - Google )
         
-------------------------------------------------------------------------------
संदर्भ : 
१) https://www.vikrampendsecycles.in/
२) ''DOCUDRAMA I Vikram Pendse Cycles Museum I विक्रम पेंडसे सायकल्स संग्रहालय '' https://www.youtube.com/watch?v=ea2fM_rEv1M या युट्युब विडिओ च्या मुलाखतीतून 
३) (रि)सायकलींचे 'विक्रमी' संग्रहालय - महाराष्ट्र टाइम्स मधील लेख (१८ मे २०१७ )
-------------------------------------------------------------------------------
वेळ - ११ ते ७ (पूर्वनियोजित वेळेनुसार) , मंगळवारी बंद (शासकीय सुट्ट्यांदिवशी चालू)
पत्ता - २२ , हर्ष सहवास सोसायटी , कर्वेनगर , पुणे ५२
फोन नंबर - ८५३०४१८५१७ 
तिकीट - १०० रुपये
वेबसाईट - www.vikrampendsecycles.in
-------------------------------------------------------------------------------
पुण्यातील डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, खुन्या मुरलीधर अशा अनेक ठिकाणांच्या नावांमागील रहस्य जाणून घ्यायचंय...तर मग आजच "नावामागे दडलंय काय ?" हे पुस्तक खरेदी करा...

पुस्तक Amazon, Flipkart, Bookganga.com, SahyadriBooks.com, Akshardhara.com इथे ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच रसिक साहित्य-अप्पा बळवंत चौक, अक्षरधारा-टिळक रस्ता, बुकगंगा-डेक्कन जिमखाना येथेही पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीकरण्याची ऑनलाइन लिंक

https://www.flipkart.com/navamage-dadlay-kay-history-important-places-pune-city/p/itm6d6af57cb232c

---------------------------------------------------------------------------------
© २०१९ सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp