नंदनवन काश्मीरचा अलंकार " दूधपाथरी "

भारताच्या नकाशावर काश्मीर शोभीवंत मुगुटस्थानी असल्यासारखा भासतो. काश्मीरला आपण ''पृथ्वीवरील स्वर्ग'' म्हणून देखील संबोधतो. आणि ते अगदी खरं आहे. काश्मीरमध्ये अनेक हिरे-माणकांसारखी शांत व सुंदर ठिकाणे अजूनही लपलेली आहेत. "दूधपाथरी" हे त्यांपैकी एक. जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात हे ठिकाण स्थित आहे. समुद्र सपाटी पासून ८,९५७ फूट उंचीवर वसलेले आहे आणि उन्हाळी राजधानी श्रीनगरपासून ४२ किमी अंतरावर आहे.

हिमालयातील पीर पंजाल रांगेतील एका वाटीच्या आकाराच्या खोऱ्यात दूधपाथरी आहे. दूधपाथरी म्हणजे ''व्हॅली ऑफ मिल्क''. येथील डोंगरदऱ्यांतून खळाळणाऱ्या पाण्याचा प्रवाह दुधासारखा वाटतो, म्हणून दूधपाथरी नाव पडले असावे असे म्हणतात. याव्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी की, जम्मू काश्मीरच्या एका प्रसिद्ध संत पुरुषाने एकदा जमिनीतील पाण्यासाठी प्रार्थना केली, त्यांनी काठीचा वापर करून तेथे खणल्यावर त्याच्यातून दुधाचा प्रवाह वाहू लागला. तेव्हा पासून दूधपाथरी म्हणून या जागेला ओळखले जाऊ लागले, असेही सांगितले जाते.

दूधपाथरी
दुधासारखा फेसाळता प्रवाह 

हिमाच्छादित हिमशिखरे, त्यांच्या पायथ्याचे पाईन व देवदारचे वृक्ष, गवताळ कुरणांमध्ये चरणाऱ्या मेंढ्यांचे कळप, आकाशात जमलेल्या ढगांची दाटी आणि पर्वतशिखरांवरून कोसळणारा दुधाळ-फेसाळ जलप्रवाह पाहून आपण स्वप्नात आहोत की काय असे वाटते. येथील थंड सुखद हवा मनाला मोहवून टाकते. येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ साधारण एप्रिल ते सप्टेंबर. येथील स्थानिक लोकांकडून चहा, ऑम्लेट वगैरे स्नॅक्सची सोय होते. तसेच गवताळ भागात घोडयावरून रपेटचाही आनंदआपण लुटू शकतो.

सुंदर रस्ता
टांगनार, मुजपाथरी, पालमैदान ही इथली जवळील पर्यटनस्थळे असून येथे ट्रेकिंग व कॅम्पिंग स्पॉट्स देखील आहेत. श्रीनगरहून दूधपाथरी हे एकदिवसीय सहलीचे ठिकाण आवर्जून भेट देण्याजोगे रमणीय निसर्गस्थान आहे. परंतु पर्यटकांची पावले येथे वळत नाहीत. जास्त काळ काश्मीर मध्ये ज्या पर्यटकांचे वास्तव्य असते तेच इकडे भेट देतात. पण चार दिवसांच्या मुक्कामातही ही स्वर्गवत जागा बघण्यासारखी आहे. खराब रस्त्यांमुळे श्रीनगरहून येथे पोचण्यास साधारण दोन-अडीच तासांचा वेळ लागतो. जम्मू काश्मीरच्या पर्यटन नकाशात अपरिचित दूधपाथरीचा नुकताच समावेश झाला आहे. पर्यटकांच्या लोंढ्यांपासून दूर असलेले हे ठिकाण भविष्यात होऊ घातलेल्या विकासाच्या नावाखाली भकास होऊ नये, एवढीच अपेक्षा.


-------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१) चला काश्मिरला भूनंदनवनाच्या सहलीला - पांडुरंग पाटणकर 
-------------------------------------------------------------------------------
 © २०१९ सुप्रसाद पुराणिक

Comments